आयएएस अधिकाऱ्याचा कुत्रा हरवला; पोलिसांकडून शोध सुरू, बेपत्ता असल्याचे पोस्टर्स चिकटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य - एएनआय

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील आयएएस अधिकाऱ्याचा कुत्रा बिलौआ परिसरातून बेपत्ता झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पोलीस शोध मोहिमेत गुंतले आहेत. कुत्र्याच्या शोधासाठी पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते परंतु शोध मोहिमेचे कोणतेही फलित न झाल्याने त्यांना परिसरात कुत्र्याचे हरवल्याचे पोस्टर्स लावावे लागले.

दिल्लीत तैनात असलेल्या मध्य प्रदेश केडरच्या अधिकाऱ्याचे दोन कुत्रे दिल्लीहून भोपाळला नेले जात होते. कुत्र्याला गाडीतून घेऊन जाणारे कर्मचारी बिलाआजवळील ढाब्यावर जेवण घेण्यासाठी थांबले. कर्मचारी जेवण करत असताना दोन्ही कुत्रे गाडीतून पळून गेले. शोध घेतल्यानंतर कर्मचार्‍यांनी एका कुत्र्याला पकडले मात्र दुसरा कुत्रा सापडला नाही.

पोलीस कर्मचार्‍यांनी शोधमोहीम सुरू केली परंतु कुत्रा कुठेच सापडला नाही, तेव्हा त्यांना ढाब्याच्या परिसरात आणि आजूबाजूला हरवल्याचे पोस्टर लावण्यास सांगितले.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आयएएस अधिकाऱ्याला कॉलवर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ग्वाल्हेर प्राणीसंग्रहालयातील कर्मचार्‍यांना सोबत घेतले आणि कुत्र्याचा शोध सुरू केला. आजूबाजूच्या ढाब्यांवर बेपत्ता पोस्टर्सही चिकटवण्यात आले आहेत.

‘बिलुआ भागातील एका ढाब्यावर काही लोक आले होते जेव्हा त्यांचा कुत्रा त्यांच्या कारमधून उडी मारून पळून गेला होता. ते दिल्लीहून भोपाळला जात होते. तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि जवळपासच्या रेस्टॉरंट्स आणि दुकानांना माहिती देण्यात आली आहे’, अशी माहिती डाबरा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDOP) विवेक शर्मा यांनी दिली.

‘शुक्रवारी रात्री येथे एक वाहन थांबले. कर्मचारी जेवत होते आणि त्यादरम्यान एक कुत्रा बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुत्र्याच्या शोधात अधिकारी स्वत: पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसह येथे आले’, अशी माहिती कुत्रा जिथून बेपत्ता झाला त्या ढाब्याचे मालक जयप्रकाश यांनी सांगितले.

‘कुत्रा सापडला नाही तेव्हा त्याच्या शोधासाठी पोस्टर लावण्यात आले होते. ज्यामध्ये हरवलेल्या कुत्र्याबद्दल सांगणाऱ्याला योग्य बक्षीस दिले जाईल’, असे ते म्हणाले.