
ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ज्ञानवापी मशीद संकुलातील तळघरात नमाज अदा करण्यास परवानगी देण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ज्ञानवापी मशीद समितीची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली असून तळघरामध्ये पूजा करण्यास परवानगी कायम ठेवली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी हा निकाल दिला.
याआधी वाराणसी जिल्हा न्यायालयानेही या प्रकरणात हिंदुंच्या बाजूने निर्णय दिला होता. याच्याविोधात मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायालयात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. अंजुमन इंतजामिना मशिद समितीकडून वाराणसी न्यायालयात आव्हान दिले होते. ज्यामध्ये पूजेवर स्टे लावण्याबाबत उल्लेख केला होता. मुस्लिम पक्षाकडून असा दावा केला की, डीएमला वाराणसी कोर्टाने रिसीव्हर म्हणून नियुक्त केले आहे, जे आधीपासूनच काशी विश्वनाथ मंदिराचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. मुस्लीम पक्षाने असेही म्हटले आहे की, कागदपत्रात कोणत्याही तळघराचा उल्लेख नाही. व्यासजींनी पुजेचे अधिकार आधीच ट्रस्टकडे हस्तांतरित केल्याचेही मुस्लिम पक्षाने म्हटले होते. त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाही.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर तळघर खुले करण्यात आले. शैलेंद्र कुमार पाठक यांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर 31 जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार हिंदू पक्षाला पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला होता. पूजा सुरू होण्यापूर्वी, हिंदू बाजूने दावा केला होता की नोव्हेंबर 1993 पूर्वी तत्कालीन राज्य सरकारने व्यास तळघरात पूजा थांबवली होती. जे पुन्हा सुरू करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्याच वेळी, मुस्लिम बाजूने प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदू बाजूने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला.


























































