रिओ ऑलिम्पिकमधला 14 ऑगस्ट 2016 हा दिवस कुणीही हिंदुस्थानी अजून विसरलेला नसेल. त्यादिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकरच्या अतुलनीय कामगिरीने अवघ्या सव्वाशे कोटी हिंदुस्थानींची छाती अभिमानाने फुगली होती. वॉल्ट प्रकारात दीपाचे पदक अवघ्या 0.15 गुणांनी हुकले होते. ती पदक जिंकू शकली नाही, पण तिने अवघ्या हिंदुस्थानचे मन जिंकले होते. त्या दीपा कर्माकरने वयाच्या 31 व्या वर्षी जिम्नॅस्टिकला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने आपल्या हृदयावर दगड ठेवत हा निर्णय जाहीर केला, ती फक्त खेळाडू म्हणून निवृत्त होतेय, माझ्यात असलेल्या खेळाचा मी प्रशिक्षक, मार्गदर्शक म्हणून आयुष्यभर या खेळाला सहकार्य करत रहाणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
दीपाने आज एक्सवर आपल्या भावना व्यक्त करत निवृत्ती जाहीर केली. खूप विचाराअंती आपण या निर्णयापर्यंत पोहोचलोय. माझ्यासाठी हा निर्णय घेणे खूप अवघड होते. पण हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याची मला कल्पना होती. मला जेव्हापासून कळतेय, तेव्हापासून मी जिम्नॅस्टिक खेळतेय. हा खेळ माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मी खेळात अनेक चढउतार पाहिलेत. अनेक आनंदाचे क्षणही उपभोगलेत. मी या प्रत्येक क्षणासाठी या खेळाची ऋणी असल्याची भावना तिने व्यक्त केली.
कुणाला विश्वासच नव्हता…
खरं सांगायचे तर कुणाला विश्वासच नव्हता की मी जिम्नॅस्टिक खेळू शकते. वॉल्ट प्रकारात भाग घेऊ शकते. माझे सपाट पाय पाहून लोकांनी मला खूप वाईट म्हटले होते. पण आज मला माझीच कामगिरी पाहून फार अभिमान वाटतेय. या स्तरावर हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व करणे आणि हिंदुस्थानला पदके जिंकून देणे, हे माझ्यासाठी फारच गौरवास्पद आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रोदुनोव्हा वॉल्ट करणे माझ्या कारकीदातील संस्मरणीय घटना आहे. आज मला त्या दीपाला पाहून खूप आनंद होतोय, तिने स्वप्न पाहाण्याची हिंमत दाखवली. ताश्कंद येथे झालेली आशियाई जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. या स्पर्धेत मला जाणवलं की, माझे शरीर मला साथ देत नाहीय. मला आता थांबायला हवे. पण माझे मन अजून ते मान्य करत नाहीय. मी माझ्या या कारकीर्दीसाठी माझे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी सर आणि सोमा मॅडम यांची आयुष्यभरासाठी ऋणी असेन. मी जे काही आहे, ते या दोघांमुळेच. गेली २५ वर्षे हेच दोघे माझी ताकद राहिलेत. त्यांनी मला घडवलेय.
प्रशिक्षक, मार्गदर्शक होणार
मी खेळाडू म्हणून निवृत्त होतेय. मी जिम्नॅस्टिक कधीच सोडू शकत नाही. विसरू शकत नाही. या खेळाने मला इतके भरभरून दिलेय. त्यामुळे या खेळासाठी मलाही देणं लागतंय. मी एक प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून भावी पिढीला नक्कीच मार्गदर्शन करू शकते आणि ते मी नक्कीच करेन.
दिपा कर्माकरची कारकीर्द
रिओ ऑलिम्पिक 2016- जिम्नॅस्टिकच्या वॉल्ट क्रीडा प्रकारात दीपाने चौथे स्थान पटकावले होते. अशी किमया करणारी ती पहिलीच हिंदुस्थानी जिम्नॅस्ट होती. आजही तिच्या तोडीची कामगिरी कुणालाही जमलेली नाही.
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2014 – ग्लासगो येथे झालेल्या स्पर्धेत तिने कांस्य पदकाची कमाई केली होती. याच पदकामुळे तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली.
आशियाई अजिंक्यपद- 2015 साली भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते.
पद्मश्री पुरस्कार- 2015 साली तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीसाठी केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
फ्लिक फ्लॅक- दीपाने प्रोदुनोव्हा नामक अवघड वॉल्ट तंत्राला यशस्वीपणे केले. हे तंत्र इतके आव्हानात्मक आहे की जगातील काही मोजक्याच जिम्नॅस्टला जमले आहे.