
अमित घोडेकर
फेसबुक वापरणाऱया तब्बल 5 कोटी लोकांची माहिती एका अज्ञात हॅकरने चोरली आहे आणि त्याने त्याचा भक्कम पुरावादेखील दिला आहे. कसा मार्ग काढायचा यातून…
गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक खूप गाजतंय. असे तसे दिवसातले तासन्तास फेसबुकवर पडीक असणारे अनेक जण फेसबुक वापरताना थोडं बिचकूनच फेसबुक वापरत आहेत. फेसबुकने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुक वापरणाऱया अमेरिकन जनतेची माहिती केंब्रिज ऍनालिटिका नावाच्या कंपनीला विकला तिथून हे सगळं सुरू झाले अजून मार्क झुकरबर्ग या फेसबुकच्या संस्थापकाच्या मागचा चौकशीचा ससेमिरा संपत नव्हता की, परत गेल्या आठवडय़ात एक मोठी गोष्ट घडली, ज्यामुळे फेसबुक परत एकदा खूप मोठय़ा अडचणीत सापडले आहे, आणि गोष्टदेखील खूप मोठी आहे. फेसबुक वापरणाऱया तब्बल 5 कोटी लोकांची माहिती एका अज्ञात हॅकरने चोरली आहे आणि त्याने त्याचा भक्कम पुरावादेखील दिला आहे. एकंदरीत फेसबुकवर खूप मोठी संक्रांत आली आहे.
गेल्या वर्षीची अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक खूप गाजली. आपल्यासारखेच तिकडे पण मतदानापूर्वीच्या आणि मतदानानंतरच्या अंदाजाच्या चाचण्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. सगळ्यांनी जवळपास एकाच व्यक्तीबद्दल विजयाची शक्यता सांगितली होती. निवडणूक निकालाच्या दिवशी मात्र काहीतरी भलतंच घडलं आणि असा व्यक्ती निवडून आला, त्यानंतर मात्र अमेरिकेतल्या अनेक गोष्टी घडल्या. अखेर मतदारांनी आपले मत ऐन वेळेस का बदलले हे कळल्यावर सगळ्या जगाला धक्का बसला आणि ते कारण होतं फेसबुक!
केंब्रिज ऍनालिटिका नावाची एक कंपनी त्याच्या डेटा संशोधनासाठी खूप प्रसिद्ध आहे. या कंपनीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या एका उमेदवाराने आपल्यासाठी काम करण्यास सांगितले मग त्यांनी फेसबुक कडून अमेरिकेतील फेसबुक वापरणाऱया लोकांची माहिती घेतली. ही माहिती म्हणजे त्यांची आवड निवड, त्यांची राजकीय आणि सामाजिक मते आणि त्यांच्या अपेक्षा, मग त्या माहितीचा वापर करून त्या उमेदवाराने मतदारांना अभिप्रेत असणाऱया अनेक गोष्टीचे आमिष दाखवले. जसजशी केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुकबद्दलची ही गोष्ट बाहेर येऊ लागली तसतशी सगळ्या जगात खळबळ माजली. हे प्रकरण एवढं हाताबाहेर गेलं की, चक्क अमेरिकन कॉंग्रेसने मार्क झुकरबर्गला संसदेत बोलावून त्याची उलटतपासणी घेतली.
हे प्रकरण मिटत नाही तोच आता एका हॅकरने फेसबुक वापरणाऱया तब्बल 5 कोटी लोकांची माहिती चोरली आहे असा दावा केला आहे आणि त्याचा पुरावादेखील दिला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे हे कमी की काय, या हॅकरने चक्क मार्क झुकरबर्गचे फेसबुक पेज सगळ्या जगासमोर बंद पाडण्याचे आव्हानदेखील दिले आहे. त्यामुळे फेसबुक वापरणारे लोक घाबरून गेले आहेत. जर एखादा हॅकर मार्क झुकरबर्गचेच पेज बंद पाडू शकतो, तर मग आपली काय गोष्ट. फेसबुकच्या या सगळ्या फियास्कोमुळे फेसबुक वापरणारे लोक फेसबुकपासून दुरावणार हे नक्कीच. त्यामुळे फेसबुकवर आलेल्या या संक्रांतीमधून मार्क झुकरबर्ग कसा मार्ग काढतो हे बघावे लागेल आणि त्यातच फेसबुकच्या भावी वाटचालीचे यश सामावलेले असेल.
























































