
सामना प्रतिनिधी । लातूर
दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन उडीद मूग या अन्य पिके करपून गेली. परंतु आज वादळी वाऱ्यासह रेणापूर तालुक्यातील बिटरगाव, गरसुळी, टाकळगाव, कामखेडा, सुमठाणा आदी गाव प्रचंड गारपीट झाली. यात शेतातील उभ्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रेणापुर तालुक्यात सर्वत्र शेतमालाचे नुकसान झाले आहे. शिवारात उभ्या सोयाबीनमधील दाणे अक्षरशः गळून पडले आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करुन मदत करण्याची अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. गारपिटीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
रेणापूर तालुक्यातील बिटरगाव परिसरात बुधवारी व गुरूवारी अचानक वादळी वार्यासह पाऊस पडला असून मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांना देण्यात आली असून माजी आमदार कव्हेकर यांनी नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी असे लेखी निवेदन त्यांना दिले.
यावेळी सदरील निवेदनावर विभागीय आयुक्त भापकर यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश लातूर जिल्हाधिकारी व रेणापूर तहसिलदार यांना देण्यात येत असल्याचा शेरा मारून शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल असे, आश्वासन माजी आ.कव्हेकर यांच्याशी बोलताना दिले.

































































