
2022 मध्ये इस्रोने एचएएल आणि एल अँड टीच्या कन्सोर्टियमसोबत पाच एसएलव्ही-एक्सएल रॉकेट बनवण्याचा करार केला होता. हा करार त्याच योजनेचा एक भाग आहे. याअंतर्गत ते आपली मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी इंडस्ट्रीला सोपवणार आहेत.
हिंदुस्थानी अंतराळ इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. आतापर्यंत देशात रॉकेट लाँचिंग म्हणजे केवळ हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) असे समजले जात होते, परंतु आता लवकरच यात बदल होताना दिसणार आहे. देशातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) मिळून इतिहासाला गवसणी घालण्याची तयारी करत आहे. या दोन्ही कंपन्या मिळून देशातील पहिले स्वदेशी पीएसएलव्ही रॉकेट तयार करणार आहे. हे रॉकेट नव्या वर्षात लाँच केले जाणार आहे.
एचएएल आणि एलअँडटीने तयार केलेले हे पहिले रॉकेट 2026 च्या सुरुवातीला लाँच पॅडवर असेल. याचे पहिले मिशन ओशनसॅट हे सॅटेलाइटला कक्षेत घेऊन जाईल. एल अँड टीचे वरिष्ठ अधिकरी ए. टी. रामचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉकेटच्या हार्डवेअरची डिलिव्हरी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी वर्षात आपण दोन ते तीन मोठे लाँच पाहू शकता, असे ते या वेळी म्हणाले. रामचंदानी हे हिंदुस्थान अंतराळ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सध्या सॅटेलाइटची मागणी खूप वाढली आहे. या पाच रॉकेट्सनंतर कन्सोर्टियमला आणखी 10 रॉकेट बनवण्याचे काम मिळू शकते, असे ते म्हणाले. हिंदुस्थानातील खासगी कंपन्या आता लाँचिंगमध्ये उतरल्या आहेत.
इस्रोने बदलले धोरण
इस्रो आता खासगी कंपन्यांकडे काही महत्त्वाचे काम का सोपवत आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. परंतु इस्रोने हे जाणीवपूर्वक केलेले काम आहे. नियमित रॉकेट बनवण्याऐवजी आता संपूर्ण लक्ष मिशन, संशोधन आणि नवीन टेक्नोलॉजीवर लावणे गरजेचे आहे, असे इस्रोला वाटणे स्वाभाविक आहे. इस्रोने आपल्या छोटे रॉकेट एसएसएलव्हीची टेक्नोलॉजीसुद्धा एचएएलकडे सोपवली आहे. कारण भविष्यात सॅटेलाइटच्या बाजारात हिंदुस्थानचा कब्जा असायला हवा.


























































