अर्ध्या तिकिटामुळे महिला प्रवासी दुप्पट; एनएमएमटीच्या 77 मार्गावर रोज दोन लाख नागरिकांचा प्रवास

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने (एनएमएमटी) महिलांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत दिल्यानंतर महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. वर्षभरापूर्वी एनएमएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दररोज ३९ हजार इतकी होती. आता ही संख्या थेट ९१ हजार इतकी झाली आहे. एनएमएमटीकडून नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेल आदी शहरांत ७७बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. या मार्गांवर दररोज सुमारे दोन लाख प्रवासी एनएमएमटीच्या बसेसने प्रवास करीत आहेत.

एनएमएमटी प्रशासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये महिला प्रवाशांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली होती. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ऑक्टोबर २०२४ पूर्वी एनएमएमटीच्या बसेसमधून सर्वच बसमार्गांवर दरदिवशी ३९ हजार महिला प्रवासी प्रवास करीत होत्या. मात्र ही सवलत जाहीर झाल्यानंतर दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या थेट ९१ हजार इतकी झाली आहे. शहरातील काही ठरावीक मार्ग सोडले तर जवळपास सर्वच मार्गांवर महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. अटल सेतू मार्गे सुरू करण्यात आलेल्या नवीन बससेवेलाही महिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एनएमएमटीने खालापूर, खोपोलीपासून ते बोरिवलीपर्यंत विविध मार्गांवर प्रवासी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची संख्या एक लाख ८२ हजार इतकी झाली आहे.

३७ मार्ग वातानुकूलित
एनएमएमटीच्या माध्यमातून एकूण ७७बसमार्गावर प्रवाशांना सेवा दिली जाते. त्यापैकी ४० बसमार्ग हे सर्वसाधारण आहेत, तर ३७ बसमार्ग हे वातानुकूलित आहेत. वातानुकूलित बसमार्गांवरील बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.