
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्यातल्या कोणत्याही सरकारी कार्यालयांत सकाळी गेल्यास टेबलावरचा अधिकारी असो किंवा कारकून असो. साहेब चहा प्यायला गेले आहेत, थोडा वेळ थांबा असे उत्तर येते. दुपारी गेल्यास साहेब जेवायला गेल्याचे उत्तर तोंडावर फेकले जाते. ‘सरकारी काम सहा महिने थांब’ अशी अवस्था सर्वसामान्यांची होते. पण सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घेत आता सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुपारी अर्धा तासच जेवणाची वेळ निश्चित केली आहे दुपारी 1 ते 2 या वेळेतच लंच ब्रेक घेण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. पण या वेळेत खात्यातल्या सर्वांनी एकाच वेळेस जेवायला जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
मुंबई तसेच मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांच्या वेळा ऑगस्ट 1988 मध्येच निश्चित केल्या आहेत. त्यानुसार दुपारच्या जेवणासाठी 30 मिनिटांची वेळ निश्चित केली आहे. तर 18 सप्टेंबर 2001 च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुपारी 1 ते 2 या वेळेत जास्तीत जास्त 30 मिनिटांची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालयाव्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबंध असलेल्या कार्यालयांमध्ये सर्वसामान्य लोक तक्रारी व गाऱहाणी घेऊन येतात तेव्हा बऱ्याच वेळेस अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाहीत. त्याबाबत विचारणा केली असता ही जेवणाची वेळ असल्याचे सर्वसामान्यांना सांगण्यात येते. विविध सरकारी कार्यालयांमध्ये दुपारची जेवणाची वेळ संबंधित कार्यालयाच्या सोयीनुसार ठरवली जाते. त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी राज्य सरकारकडे मोठय़ा प्रमाणावर आल्या होत्या. त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये जेवणाची वेळ निश्चित करण्याची योजना होती असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.
अशी असेल वेळ
भोजनासाठी दुपारी 1 ते 2 यादरम्यान अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. दुपारच्या जेवणासाठी अधिकारी व कर्मचारी 30 मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेणार नाहीत आणि एकाच शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच वेळेस जेवणासाठी जाणार नाही याची संबंधित कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना 30 मिनिटांत जेवण संपवून टेबलवर बसून काम सुरू करावे लागणार आहे.






























































