इस्रायल-हमासमध्ये पुन्हा युद्धाचा भडका

इस्रायल-हमासमधील युद्धविराम संपुष्टात आल्यानंतर पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू झाले असून गाझा भागातून इस्रायली शहरांवर रॉकेट डागण्यात आली. त्याचवेळी इस्रायलने विमानांतून केलेल्या बॉम्बफेकीत 3 तासांत गाझामध्ये महिला आणि लहान मुलांसह 32 पॅलेस्टिनी मारले गेले.

इस्लामिक जिहादच्या लष्करी शाखा अल-कुद्सने इस्रायलच्या अनेक शहरांवर रॉकेट हल्ले केल्यावर, इस्रायलने उत्तर इस्रायलमधील 2 महामार्ग बंद केले आहेत. याशिवाय सीमावर्ती भागात शेतीच्या कामावरही बंदी घालण्यात आली आहे. इस्रायलने सकाळी रफाहजवळ बॉम्बफेक केल्याचे हमासने म्हटले आहे.

7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात इस्रायलमधील 1200 आणि गाझामध्ये 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धविराम संपल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पुन्हा इस्रायलकडे धाव घेतली आहे.

न्यू यॉर्क टाइम्स म्हणतो, हल्ल्यांची कल्पना इस्रायलला वर्षभरापासून होती…

हमासने इस्रायली भूमीवर हल्ला करण्याची योजना आखली असल्याची कल्पना इस्त्रायली लष्कराला, 7 ऑक्टोबर च्या विध्वसंक हल्ल्यापूर्वी वर्षभरापासून होती, असे वृत्त द न्यू यॉर्क टाईम्स ने दिले आहे. हमास अशा घातकी हल्ल्याची तयारी करत असल्याच्या इशाऱयांकडे इस्रायली लष्करातील वरिष्ठ अधिकाऱयांनी एकतर दुर्लक्ष केले वा अशी माहिती गांभीर्याने घेतली नाही. जेरीको वॉल हे कोड नेम दिलेल्या या हल्ल्याच्या आखणीचा 40 पानी तपशील इस्रायली सैन्य आणि गुप्तचर अधिकाऱयांकडे होता, पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा या वृत्तातील दावा आहे.