मातीतले खेळ…परदेशातील देशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ तोरसकर,[email protected]

हॅण्डबॉल. मातीतला वेगवान खेळ. परदेशातील खेळ असला तरी तो आपल्याकडेही खेळणं सोपं असतं.

हॅण्डबॉलचा इतिहास पाहायला गेल्यास थेट जर्मनचे जिम्नॅस्टिक मार्गदर्शक कॉनराड कॉच यांच्यापर्यंत जायला लागेल. कॉनराड कॉच यांनी हॅण्डबॉल या खेळाची रचना व नियमावली तयार केली. 1925 साली जर्मनीतील हाले या शहरात ऑस्ट्रीया व जर्मन या दोन देशांत पहिला हॅण्डबॉलचा सामना खेळला गेला. 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच हॅण्डबॉल हा खेळ म्हणून समावेश करण्यात आला. त्यावेळी हॅण्डबॉलचे सामने खुल्या मैदानात आयोजित केले होते. या स्पर्धेत एका संघात 11-11 खेळाडूंचा समावेश केला होता व सहा देश या स्पर्धेत सहभागी झाले होते. 1938 साली पुरुषांची पहिली जागतिक स्पर्धा पार पडली तर महिलांची पहिली जागतिक स्पर्धा सुरू होण्यासाठी 1949 साल उजाडावे लागले (काहीजण महिलांची जागतिक स्पर्धा 1957 साली झाल्याचे म्हणतात).

1988 व 1992च्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांचे विजेतेपद पटकावून द. कोरियाने या विभागात एक वेगळी ओळख निर्माण केली. हॅण्डबॉल हा खेळ खेळताना प्रत्यक्ष सात खेळाडू प्रत्येक संघाकडून मैदानात खेळतात. यापैकी सहा खेळाडू चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोल जाळ्यात पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात, तर उरलेला खेळाडू आपल्या संघावर गोल होऊ नये म्हणून गोलजाळ्याजवळ गोलकीपरचे काम करत असतो. हा खेळ तीस-तीस मिनिटांच्या दोन भागांत विभागाला जातो अर्थात त्यास पूर्वार्ध व उत्तरार्ध असेही म्हातात.

हा खेळ खेळताना आपल्याला प्रचंड वेगाने हा खेळ खेळावा लागतो व त्यातील निर्णयसुध्दा अतिशय वेगाने घ्यावे लागतात. या खेळात एखाद्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडे चेंडू असेल तर तो चेंडू जोपर्यंत हवेत अथवा जमिनीवर कोणाच्या नियंत्रणात नसतो त्यावेळीच तुम्ही त्याच्यावर कब्जा मिळवू शकता. मात्र एखाद्या खेळाडूच्या हातात चेंडू असेल तर तो तुम्ही आपल्या गोल जाळ्यात फेकण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू शकता, मात्र शक्यतो शरीरास स्पर्श करण्यास मज्जाव आहे. याचा अर्थ असा नव्हे की, या खेळात शरीरास स्पर्शच करू नये. जर चेंडू हाताळणारा खेळाडू व गोलकीपर यामध्ये तुम्ही असाल तर मात्र हा नियम शिथिल केला जातो.

हा खेळ मातीच्या, सिमेंटच्या, गवताच्या मैदनावरसुध्दा खेळला जातो. मैदानात दोन संघ असल्याने दोन्ही टोकाला दोन गोलजाळे असतात व त्या गोलजाळ्यात प्रत्येक संघातील सहा-सहा खेळाडू गोल करण्याचा व गोलकीपर तो अडवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी 40 मी. X 20 मी. असे आयतकृती मैदान असते. मध्य रेषेने मैदानाचे दोन भाग केले जातात. 40 मी. लांबीच्या रेषेस साईड लाइन तर 20 मी. लांबीच्या रेषेस गोल लाइन असे संबोधले जाते. 20 मी. लांबीच्या रेषेच्या मध्यावर तीन मीटर लांब व दोन मीटर उंच गोलपोस्ट असतात. गोलपोस्ट हे लाकडी किंवा हलक्या धातूचे असावे लागतात. गोलपोस्ट हे दोन वेगेवेगळ्या रंगांनी रंगवलेले असतात व ते प्रत्येक 20 सेंटीमीटर अंतरावर हा रंग बदलेला असतो. तर गोलपोस्टचे दोन्ही कोपरे हे एकाच रंगाने रंगविलेले असले तर हे अंतर मात्र 28 सेंटीमीटर असते. गोलपोस्टच्या मागे लावलेली जाळी मात्र व्यवस्थित व मजबूत असावी लागते. गोलपोस्टच्या पुढे सहा मीटरवर गोल लाइन (डी लाइन-इंग्रजी ‘डी’ आकाराची) असते. तर नऊ मीटरवर फ्री थ्रो लाइन व सात मीटरवर पेनल्टी लाइन असते. चार मीटरवर गोलकीपर प्रतिबंध रेषा असते तर 20 मीटर ही मध्य रेषा असते. 4.5 मीटरवर खेळाडू बदल रेषा असते. या सर्व रेषांची जाडी जळजळ 5 सेंटीमीटर असते. चेंडू गोलजाळ्यात फेकताना खेळाडूने चेंडू घेऊन गोल लाइन (डी लाइन)च्या आत जाऊ नये. मात्र चेंडू फेकताना डी एरियात हवेत असेल तर मात्र चालते. या एरियात फक्त गोलकीपरच चेंडू हाताळू शकतो. मात्र इतर खेळाडूंना या लाइनला स्पर्श न करता मैदानावर हालचाली कराव्या लागतात. हॅण्डबॉलचे सामने नियंत्रित करण्यासाठी दोन पंच (1 गोल रेफ्री व 1 कोर्ट रेफ्री), एक वेळाधिकारी व एक गुलेखक असे चार पंच समानाधिकारी म्हणून काम पहात असतात.

हॅण्डबॉल खेळल्याने आपल्या शरीरस काय काय फायदे होतात हेसुध्दा आपण आता जाणून घेऊया. हॅण्डबॉल हा सुदृढता व कौशल्य असलेला व कोणत्याही वयात खेळता येणारा एक उत्कृष्ठ खेळ आहे. याच्या सब ज्युनिअर, ज्युनिअर व खुल्या गटाच्या स्पर्धा मुले व मुलींसाठी तसेच पुरुष व महिलांसाठी आयोजित केल्या जातात. हा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा दमदारपणा वाढतो, हृदयाभिसरण अतिशय चांगले होते. स्नायूची ताकद तर वाढतेच त्याचबरोबर ते दणकट बनतात व त्यात लवचिकतासुध्दा येते. कोणत्याही क्षणी सहज तोल सांभाळता येतो. नियम अतिशय सोपे असल्याने कोणत्याही खेळाडूने हा खेळ खेळल्यास त्यास सहज आनंद मिळतो व आपल्या शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. हा खेळ खेळल्याने उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य व डावपेच आखण्याचे ज्ञान प्राप्त होते. क्षणिक निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होते तर जीवन जगण्याचा आपला दृष्टिकोनसुद्धा बदलून जातो.