अन्नू,पारुलची सुवर्ण किमया

अॅथलेटिक्समध्ये आज जोरदार धमाका करताना पारुल चौधरीने अडथळा शर्यतीत तर अन्नू राणीने भाला फेकीत सोने जिंकण्याची किमया साधत हिंदुस्थानला आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण जिंकून दिले. आज हिंदुस्थानने अॅथलेटिक्समध्ये सहा पदके जिंकत आपली पदक संख्या 69 वर नेली. चीनने 161 सुवर्णांसह 297 पदके जिंकून आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे तर हिंदुस्थान 15 सुवर्ण पदकांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

अखेरच्या काही सेकंदांत पारुलने मारली बाजी
शर्यतीची संथ सुरुवात केल्याने पारुल चौधरी आधी पिछाडीवर होती, मात्र अखेरच्या काही सेकंदांत पारुलने जिवाचे रान करीत बाजी मारली. तिने 15 मिनिटे 14.75 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरीत ऐतिहासिक कामगिरी केली. जपानची हिरोनाका रिरीका हिला 15 मिनिटे 15.34 सेकंद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कझाकिस्तानची किपकिरूई पॅरोलिन (15 मिनिटे 23.12) सेपंद वेळेसह कांस्यपदकाला गवसणी घातली. हिंदुस्थानची आणखी एक खेळाडू अंकिताने अंतिम फेरी गाठली होती, मात्र तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

अन्नूने भालाफेकीत घडवला इतिहास
हिंदुस्थानची भालाफेकपटू अन्नू राणीने गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या पावलांवर पाऊल ठेवत आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी इतिहास रचला. तिचं हे दुसरं आशियाई अन पहिलं सुवर्ण पदक ठरलं. अन्नूने आपल्या चौथ्या प्रयत्नात 62. 92 मीटर फेकलेला भाला तिच्या सुवर्णपदकासाठी पुरेसा ठरला. श्रीलंकेच्या दिलहानी लेकेमगेने 61.57 मीटर भाला फेकून रौप्यपदक जिंकले. कांस्य पदक चीनच्या ल्यू हुईहुई हिने जिंकले.

ही अन्नूची दुसरी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. 32 वर्षीय अन्नूने 2014 साली इंचियॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत 59.53 मीटर भाला फेकून कांस्य पदक जिंकले होते. 2018 साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तिला पदक जिंकण्यात अपयश आले होते. तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत नीरज चोप्राने हिंदुस्थानसाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. अन्नू राणीने टोकियो ऑलिम्पिकमध्येही हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच 2022 च्या राष्ट्रकूल आणि 2019 च्या दोहा येथील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदकाची कमाई केली होती. आज तिने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना भाल्याला सुवर्ण तेज दिले.

अर्जुन-सुनील जोडीला कांस्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या 1000 मीटर पॅनोई क्रीडा प्रकारात (नौकानयन) अर्जुन सिंह आणि सुनील सिंह यांनी हिंदुस्थानला मंगळवारी सकाळी दहाव्या दिवसातील पहिले पदक जिंकून दिले. हिंदुस्थानी जोडीने 3.53.329 वेळ नोंदवत कांस्यपदकाला गवसणी घातली. उझबेकिस्तान संघाने 3 मिनिटे 43.796 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, तर कझाकिस्तानच्या जोडीने 3 मिनिटे 49.991 सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले.