
चंद्रपूर यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामिण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असुन यातून टोळ्या-टोळ्यांचे माध्यमातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्रात गँगवार, खुनीसंघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ड्रोनद्वारे निगरानी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
उपरोक्त विषयाला घेवून त्रस्त मागासवर्गीय नागरीक तसेच ग्रामिण क्षेत्रातील प्रकल्प पीडितांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेऊन मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी क्षेत्रीय कार्यालय वेकोलि घुग्गुस येथे सुनावणी घेत या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीत हंसराज अहीर यांनी वेकोलितील वाढत्या गुन्हेगारीला वेकोलि प्रबंधनास जबाबदार ठरवित या गुन्हेगारीच्या उच्चाटनाकरता अंतर्गत व परिसरातील सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक व सुसज्ज ठेवण्याची सूचना केली. पेट्रोलिंग व शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करीत स्थानिक पोलिस विभागाशी समन्वय व संपर्क प्रस्थापित करीत त्यांच्या सहकार्याने वेकोलि क्षेत्रातील चोऱ्या व गुन्हेगारीवर अंकुश घालण्याचे निर्देश दिले.
या सुनावणी दरम्यान उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी काही विधायक सुचना करीत त्या अध्यक्ष महोदयांच्या निदर्शनास आणल्या. वेकोलि क्षेत्राच्या 10 किमी अंतरावर स्क्रॅपच्या दुकानांना अनुमती देऊ नये याकरिता वेकोलि प्रबंधनाने निवेदनाव्दारे संबंधितांकडे मागणी करावी, वेकोलिच्या अनेक क्षेत्रामध्ये अजूनही चोऱ्यांचे प्रमाण जैसे थे सुरू असल्याने वेकोलि प्रबंधनाने ड्रोन एजन्सीद्वारा न घेता स्वतः ड्रोनची खरेदी करून या अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवावे, ज्यादा मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी कामगारांना सुरक्षा कामी नियुक्त करावे अशा सूचना सुद्धा अहीर यांनी उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या.



























































