बेरोजगारीमुळे ‘या’ अभिनेत्यावर आली बाईक विकायची वेळ

कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. याचा परिणाम सामान्य नागरिकांबरोबरच कलाकरांवरही झाला आहे. छोट्या पडद्यावरील हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यालाही कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या तो आर्थिक अडचणीत असून जवळचे सगळे संपल्याने उदरनिर्वाहासाठी त्याच्यावर बाईक विकण्याची वेळ आली.

या अभिनेत्याचं नाव निर्भय वाधवा असं आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी मालिका आणि सिनेमांची चित्रीकरण बंद झाली होती, यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात झाली मात्र काही कलाकारांना कामच मिळाले नव्हते. यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा चित्रीकरण बंद ठेवण्यात आले होते. यामुळे मात्र काही कलाकारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. निर्भय वाधवा याचाही या कलाकारांमध्ये समावेश होता. गेल्या दीड वर्षांपासून त्याला काम मिळालं नसल्याने तो अडचणीत सापडला आहे. अखेर पैसे हाताशी राहावे यासाठी त्याने त्याची बाईक विकण्याचा निर्णय घेतला आहे.

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत निर्भयने त्याच्या सध्याच्या परिस्थिती सांगितली. त्याने सांगितले  की गेल्या दीड वर्षापासून तो कामाच्या शोधात आहे. त्याने जमवलेले पैसेही संपले. त्याला अजूनही काम मिळालेले नाहीये. निर्भयने  विघ्नहर्ता गणेश या मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका केली होती. तसेच स्टार प्लसवरच्या महाभारत मालिकेत त्याने दुशासनाची भूमिका साकारली होती. याशिवाय तो ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ मालिकेत हाकिम खान सूरीच्या भूमिकेत दिसला होता. निर्भय काही ‘लाईव्ह शो’ करत होता, मात्र कोरोना काळात ते देखील बंद झाले आहेत.

22 लाखाची बाईकचे साडेनऊ लाख मिळाले

निर्भयला अॅडव्हेचरची खूप आवड आहे. त्यासाठी त्याने कोरोनाच्या आधी एक सुपर बाईक घेतली होती. बाईकवरून लांब फिरायला जायचे त्याचे स्वप्न होते, मात्र ते त्याला पूर्ण करता आले नाही. त्याची ही बाईक त्याच्या मूळ घरी म्हणजेच जयपूरला होती. हातातील सगळे पैसे संपल्याने त्याने आपली ही बाईकही विकायचं ठरवलं होतं. 22 लाखाला विकत घेतलेली ही बाईक त्याने अवघ्या 9 लाखांना विकली. ही बाईक घेण्यासाठी गिऱ्हाईक पुढे येत नसल्याने त्याने ज्या कंपनीकडून बाईक घेतली होती, त्याच कंपनीला ती परत विकली.

आपली प्रतिक्रिया द्या