1 / 9
बार्बी डॉल हे नाव ऐकूनही माहीत नाही, अशी मुलगी सापडणं कठीण. अनेक लहान मुलींच्या भावविश्वात अढळ स्थान निर्माण करणारी बार्बी ही बाहुली आज 60 वर्षांची होतेय. साधारण साठी आली की आजी-आजोबा बनण्याचा काळ सुरू झाला, असं म्हणतात. पण, साठी गाठत असूनही बार्बी मात्र होती तशीच चिरतरुण राहिली आहे. बार्बीची जन्मकथाही तितकीच गमतीशीर आहे.
साल 1945. अमेरिकेत राहणाऱ्या रुथ आणि इलियट हँडलर यांची खेळण्यांची कंपनी होती. या दांपत्याला एक चिमुरडी होती. तीही बाहुलीशी खेळत असे. पण, त्यावेळी मिळणाऱ्या बाहुल्या या कागदी किंवा बाळरुपातल्या असत. त्यामुळे एखादी छानशी बाहुली असावी असा विचार रुथ यांच्या मनात डोकावला.
हँडलर दांपत्य एकदा स्वित्झर्लंडच्या टूरवर गेलेलं असताना रुथ यांनी तिथे जर्मनीत बनलेली लीली नावाची बाहुली पाहिली. पण, ती खेळण्यासाठी उपलब्ध नसे. याच लीलीवरून प्रेरित होऊन रुथ यांनी स्वतःच एक बाहुली तयार केली. असंख्य डिझाईन साकारून त्यांनी एक मनाजोगती बाहुली बनवली. आणि तिला स्वतःच्या मुलीच्या बार्बराच्या नावावरून नाव ठेवलं 'बार्बी'
हे साल होतं 1959. न्यूयॉर्क येथील एका खेळण्यांच्या जत्रेत बार्बी प्रथमच विक्रीसाठी ठेवण्यात आली. काळ्या-पांढऱ्या पट्टेरी कपड्यातली ही बाहुली तीन डॉलर्सना मिळत होती. बाळाच्या रुपातल्या बाहुल्यांपेक्षा ही तरुण रुपातली बाहुली मुलींना प्रचंड आवडली.
बघताबघता बार्बी डॉल्स हातोहात खपू लागल्या. पहिल्याच वर्षी तीन लाख इतका विक्रमी खप झाल्याने बार्बी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. हळूहळू हँडलर दांपत्याने बाहुलीच्या आकारात, तिच्या हावभावात आधुनिकता आणली. गंमत म्हणजे बार्बी कुणीही होऊ शकत असे. कधी डॉक्टर तर कधी आर्किटेक्ट. त्यामुळे भविष्यातल्या स्वप्नांमध्ये रंग भरणारी बाहुली म्हणून ती मुलींच्या आणखी जवळची बनली.
बार्बीची लोकप्रियता पाहून नंतर तिचं कुटुंबही विकसित करण्यात आलं. बार्बरा मिलिसेंट रॉबर्ट असं पूर्ण नावंही तिला देण्यात आलं. तिचा प्रियकरही आला. त्यानंतर हळुहळू तिचा मित्रपरिवार आणि कुटुंब विस्तारलं. पण, बार्बीला लोकप्रियतेसोबत प्रचंड रोषालाही सामोरं जावं लागलं.
याला कारण होता तो तिचा बांधा. तिचा सडपातळ बांधा पाहून मुलीही असाच विचार करतील, असा वाद समोर आला. त्यानंतर मग अजून बदल करून बार्बी नेहमीच्या परिमाणात आणली गेली. तिच्या रुपांमध्ये अजूनही बदल केले गेले.



























































