हिंदुस्थानात त्यांचे स्वागत, पण…; हरभजन सिंगने बांगलादेशला चांगलेच सुनावले

बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि भारतीय क्रिकेटमधील संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून मुक्त केल्यानंतर बांगलादेशने हिंदुस्थानात होणाऱ्या आगामी T 20 विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्याने वाद आणखी वाढला. या प्रकरणावर आता टिम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. हरभजनने स्पष्ट केले की हिंदुस्थान कोणत्याही स्पर्धांचे आयोजन करण्यास तयार आहे. सर्व संघाचे स्वागतच आहे. मात्र, यात सहभागी होण्याबाबतचा अंतिम निर्णय बांगलादेश आणि आयसीसीचा असेल, असे हरभजनने सुनावले आहे.

हिंदुस्थान सर्व संघांचे स्वागत करण्यास तयार आहे. मात्र, बांगलादेशचा संघ हिंदुस्थानात येणार की नाही हा बांगलादेश आणि आयसीसीचा निर्णय आहे. मुस्तफिजूर रहमानला केकेआरमधून मुक्त केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे बांगलादेश हिंदुस्थानात येऊ इच्छित नाही. जे घडले ते अयोग्य आहे. आयसीसीने त्यांच्या विनंतीवर निर्णय घ्यावा. आम्ही सर्वांचे हिंदुस्थानात स्वागत करतो. मात्र, त्यांना येथे यायचे आहे की नाही हा त्यांचा निर्णय आहे, असे हरभजनने स्पष्ट केले.

बीसीबीने आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल केल्यानंतर हरभजनने ही प्रतिक्रिया दिली आहे. बीसीबीने २०२६ च्या सर्व टी२० विश्वचषक सामने हिंदुस्थानबाहेर हलवण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. बीसीबीने या निर्णयामागे गंभीर सुरक्षा चिंता असल्याचे कारण दिले आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून हिंदुस्थान आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहे. मात्र, सर्व सामने पूर्णपणे श्रीलंकेतच आयोजित करण्याची मागणी बांगलादेशने केली आहे.

बीसीबीने शनिवारी झालेल्या आपत्कालीन बोर्ड बैठकीनंतर हा निर्णय घेतला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे युवा आणि क्रीडा सल्लागार डॉ. आसिफ नजरुल यांनी सध्याच्या परिस्थितीत संघ हिंदुस्थानात पाठविण्याविरुद्ध सल्ला दिल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली. या संघर्षाचे कारण म्हणजे बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजूर रहमानला मुक्त करण्याचा आदेश दिला. आयपीएल लिलावात मुस्तफिजूरला ९.२० कोटी (₹९२ दशलक्ष) मध्ये खरेदी करण्यात आले, जे कोणत्याही बांगलादेशी खेळाडूसाठी आतापर्यंतची सर्वात जास्त किंमत आहे.