बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमारांचे, मतचोरी व SIR मुळे एनडीएचा विजय – हर्षवर्धन सपकाळ

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे पार पडला. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बिहारच्या निकालानंतर सत्ताधारी जे आरोप करत आहेत त्यात काहीही सत्य नाही ते निराधार आहेत. पाच वर्ष गरिब जनतेकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दिलेले १० हजार रुपये याचाही परिणाम झाला का, यावर चर्चा होईल. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे हे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. देशाला आता टी. एन. शेषन सारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.