हरयाणात शिपायांच्या 13 जागांसाठी 27 हजार अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात बेरोजगारीची समस्या किती भीषण आहे याचा प्रत्यय हरयाणातील शिपाई भरतीसाठी आलेल्या प्रचंड अर्जांवरून आला आहे. पानिपतमधील न्यायालयामध्ये 13 शिपायांच्या पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या भरतीसाठी तब्बल 27 हजार 671 तरुणांनी हजेरी लावली. या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती आठवी उत्तीर्ण असणारी हवी अशी अट आहे. मात्र या पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींनीही अर्ज करून भरतीसाठी हजेरी लावली होती. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने आम्ही या पदासाठी अर्ज केल्याचे येथे उपस्थित असणाऱ्या अनेक युवकांनी सांगितले. ही नोकरी मिळाली तर कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल अशी अपेक्षा अर्ज करणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवारांनी व्यक्त केली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांत बी. टेक, बीएस्सी, एमए आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेलेही युवक आणि युवती मोठ्या संख्येने होते.