देवेंद्र फडणवीसांना मनःशांतीची पुस्तके पाठविणार, मंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला

1796

मुख्यमंत्रीपदाच्या ‘त्या’ पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांना नाही म्हणणारा कोणी सापडलाच नाही. त्यामुळे आता त्यांना हे सगळं सहन होत नाहीये. पण विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे आपले मित्र आहेत. यामुळे त्यांना ‘मौनंम सर्वार्थ साधनम्’, ‘मौनव्रताने मनाची शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय’ अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार असल्याचे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांना शालजोडीतून टोला हाणला आहे.

गडहिंग्लज येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री असल्याने देवेंद्र फडणवीस हे आता सिनिअर झालेले आहेत. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री असताना ‘हम करे सो कायदा’ असा त्यांचा कारभार होता. ‘त्या’ पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना फोडून त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतले. तर स्वपक्षातीलच अनेकांना घरचा रस्ता दाखविण्याचेच अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. पण सध्याच्या काळात त्याच्या बोलण्याच्या पद्धतीचेच आश्चर्यच वाटत असल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या पाच वर्षांच्या काळात त्यांना नाही म्हणणारा कोणी सापडलाच नाही. त्यामुळे आता त्याना हे सगळं सहन होत नसल्याची कोपरखळी मुश्रीफ यांनी हाणली.

आता थोडे शांत रहा, सरकार काय करते बघत बसा
दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे काम अतिशय चांगलं सुरू असून लॉकडाऊन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आता थोडे शांत राहावे आणि हे सरकार काय-काय काम करतय ते नुसते बघत राहावे अशा शब्दांत मुश्रीफ यांनी फडणवीस यांना टोले लगावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या