विखे-पाटील लवकरच महाविकास आघाडीत दिसतील – हसन मुश्रीफ

2484

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाणार असे वाटत नव्हते. मात्र, सत्ता गेल्याने त्यांना अचानक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ते आता दिवसरात्र टीका करत आहेत, असा टोला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला. विखे-पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहेत. ते लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसतील, असेही ते म्हणाले. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे खासदार सुजय विखे उपस्थित होते. त्यांनी या विधानवर फक्त स्मितहास्य केले. नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. यावेळी मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सुजय विखे, जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी एकत्र आहेत, तोपर्यंत सरकार चालेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे. त्यामुळे हे सरकार किमान 15 वर्ष चालेल, असे ते म्हणाले. विखे पाटील आपल्या विचारसरणीचे आहेत. नाईलाजास्तव ते भाजपमध्ये गेले आहेत. पुन्हा ते महाविकास आघाडीमध्ये येतील असे मुश्रीफ यांनी सांगताच एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यांच्याशेजारी विखे यांचे पुत्र सुजय विखे व्यासपीठवर उपस्थित होते. मुश्रीफ यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी फक्त स्मितहास्य केले. खासदार विखे यांना याबाबत विचारणा केली असता, आपण यावर काहीही बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या