
हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी आज काँग्रेसच्यावतीने राज्यभर सत्याग्रह करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मुंबईत होणाऱया आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्यातील काँग्रेसच्या सर्व जिल्हा मुख्यालयांत हा सत्याग्रह करण्यात येणार असून पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
भाजपशासित राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळळून देण्यासाठी राज्यव्यापी सत्याग्रह करणार असल्याचे थोरात म्हणाले. हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली. पण भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे आणि हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली, अशी टीकाही त्यांनी केली. हाथरस प्रकरणाची सर्वेच्च न्यायालयामार्फत न्यायालयीन चौकशी करावी. हाथरसच्या जिल्हाधिकाऱयाला निलंबित करावे, अशी मागणीही थोरात यांनी केली.

























































