
हातकणंगले येथील बेपत्ता टिंबर व्यापारी दीपक हिरालाल पटेल (वय 35) याचा खून करून मृतदेह राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे शेतात पुरून ठेवल्याचे 18 दिवसांनी उघडकीस आले. 15 लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचा खून झाल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
दि. 26 मार्च रोजी व्यापारी दीपक पटेल यांचे अपहरण झाल्याची तक्रार हातकणंगले पोलिसांत दाखल झाली होती. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार हातकणंगलेचे पोलीस इन्स्पेक्टर के. एन. पाटील यांनी चार पथके तपासासाठी तैनात केली होती. राधानगरी, कोल्हापूरसह, जिल्हा तसेच कर्नाटकच्या काही भागांत या पथकाने तपास केला. पट्टणकोडोली येथे पटेल यांची दुचाकी मिळाली होती, तर त्यांचे मोबाईल लोकेशन सदलगा (कर्नाटक) येथे मिळाले होते.
अपहरणानंतर दोन दिवसाने दीपक यांनी नातेवाईकांबरोबर संभाषण केले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. तीन दिवसांपूर्वी सोलापूरकडे निघालेल्या एस.टी. बसमध्ये सीटखाली हा मोबाईल लपवण्यात आल्याचे एका दाम्पत्यास दिसून आले. हा फोन हातकणंगले पोलिसांकडे देण्यात आला होता. पोलिसांनी मोबाईलवरील कॉल डिटेल्स आणि लोकेशनद्वारे वेगाने तपास सुरू केला.
दीपक पटेल हे राधानगरी तालुक्यातील असून, व्यवसायानिमित्त हातकणंगलेत स्थायिक झाले होते. बिटकॉईन शेअर ट्रेडिंगमधून त्यांचे अपहरण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
…आणि खुनाला वाचा फुटली
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक राधानगरी येथे असताना त्यांना पाटपन्हाळा येथे एका शेतात दीपकचा खून करून मृतदेह पुरून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे शोध घेतला असता दीपक यांचा मृतदेह आढळला आणि खुनाला वाचा फुटली.

























































