
वसमत तालुक्यातील हट्टा ते सांवगी मार्गावरील पूल 31 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या पावसामुळे वाहून गेला असून या मार्गावरून वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्ण, शेतकरी, नागरिक, दुध उत्पादक व विद्यार्थ्यांना आता दोरीच्या सहाय्याने पाण्यातून मार्ग काढत जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर पूल उभारावा, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून केली जात आहे.
हट्टा ते सावंगी मार्गावर असलेल्या धानोडा नाल्यावरील पुलाचे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. या पुलाचे काम हाती घेतल्याने या मार्गावरील नागरिक व वाहनधारकांसाठी कंत्राटदाराने पर्यायी तात्पुरता पुल उभारला होता. मात्र, सदर पुलाची उंची जास्त नसल्याने व चुकीच्या पद्धतीने पूल उभारल्याने 31 ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याला पूर आला आणि हा पुल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह दूध उत्पादक, शेतकरी, नागरिक व रुग्णांना दोरीच्या सहाय्याने या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
वाहत्या पाण्यातुन ये-जा करणे जीवघेणे ठरत असून वयोवृद्ध नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासह पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने आता वाहनधारकांसह सर्वसामान्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने बाजारपेठेच्या ठिकाणी पुलाअभावी जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालून सावंगी ते हट्टा मार्गावरील नाल्यावर तत्काळ पर्यायी पूल उभारण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.






























































