बाप्पाच्या मिरवणुकीत नो डीजे, नो डॉल्बी; नवरात्रीतही सायलेंट गरबा खेळावा लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी, मुंबई

ऐन गणेशोत्सवात मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्यातील डॉल्बी-डीजे व्यावसायिकांचा आवाज बंद केला. बाप्पाच्या मिरवणुकीत डीजे वाजविण्याची परवानगी देण्यात यावी अशी व्यावसायिकांची मागणी हायकोर्टाने फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बी-डीजेमुळे प्रचंड ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतच नव्हे, तर येणाऱ्या नवरात्रोत्सवातही डीजे-डॉल्बीला परवानगी देता येणार नाही, असे न्यायमूर्तींनी आज स्पष्ट केले. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे डीजे व्यावसायिक धास्तावले असून त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे.

मर्यादित आवाजात डीजे वाजवला तरीही पोलीस डीजे व्यावसायिकांवर कारवाई करत असून गणेशोत्सवाच्या पूर्वी राज्यभरातील अनेक ठिकाणी पोलिसांनी डॉल्बी-डीजे साऊंड सिस्टमची गोदामे सील केली आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईविरोधात प्रोफेशनल ऑडिओ आणि लायटिंग असोसिएशन या संघटनेने हायकोर्टात ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली.

लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकत घेऊन व्यवसाय करणाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे अॅड. सतीश तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, डीजे सिस्टम चालू करताच 100 डीबीपेक्षा आवाज वाढतो आणि त्यामुळे ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होते. हायकोर्टाने राज्य सरकारचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत डीजे-डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला व यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

न्यायालय काय म्हणाले…
सण-उत्सवाच्या काळात डीजेमुळे होणारा गोंगाट नेहमीच असतो.
मर्यादित पातळीत डीजे वाजवता येईल असे संघटनेला दुर्दैवाने सिद्ध करता आलेले नसल्यामुळे परवानगी देता येणार नाही.
मर्यादित आवाजात डीजे वाजवण्याची परवानगी मिळाली तरीही डीजेचा आवाज नेहमीच जास्त आढळत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होते.

summary-hc denied permission for dj and dolby