
सिंधुदुर्गसह कोल्हापूरच्या सीमेवर धुडगूस घालत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीला गुजरातच्या ‘वनतारा’ वन्यजीव संरक्षण केंद्रामध्ये पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. ‘ओंकार ’ हत्तीची ‘वनतारा’मध्ये तात्पुरती व्यवस्था करा, त्याची रवानगी करण्यासंदर्भात समिती नेमा, असे निर्देश कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत.
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेजवळ फिरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीबाबत प्रा. रोहित कांबळे यांनी गेल्या महिन्यात कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. ‘ओंकार’ हत्ती दोडामार्गच्या मानवी वस्तीत घुसल्यामुळे त्याला पकडून ‘वनतारा’मध्ये पाठविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्यावर प्रा. कांबळे यांनी जनहित याचिकेतून आक्षेप घेतला.
जनहित याचिकाकर्त्याने घेतला होता आक्षेप
‘ओंकार’ला कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीतील जंगलातच सोडा, चांदोली, राधानगरी, कोयना यापैकी एक अभयारण्य किंवा सह्याद्री व्याघ प्रकल्पापैकी एका ठिकाणी पाठवा, अशी मागणी याचिकाकर्ते प्रा. रोहित कांबळे यांनी केली होती.
वनविभागाचे म्हणणे काय?
‘ओंकार’ला सुरक्षित ठेवण्यासाठी ‘वनतारा’शिवाय दुसरी योग्य व्यवस्था नसल्याचे म्हणणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. तसा अहवाल न्यायालयात सादर केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोल्हापूर खंडपीठाने वन विभागाचा दावा मान्य केला. हा निर्णय देताना खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायनिवाडे विचारात घेतले.





























































