रामपूर, गुहागर रुग्णालयांच्या जागेचा प्रश्न सुटला, आरोग्य संचालकांकडून पाहणी; आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुहागर विधानसभा क्षेत्रातील श्रेणीवर्धित ग्रामीण रुग्णालयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांच्या मागणीनुसार राज्याचे आरोग्य संचालक विजय कंदेवाड यांनी नुकतीच गुहागर आणि रामपूर या ग्रामीण रुग्णालयांची पाहणी केली.

त्यानंतर आरोग्य संचालकांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन या दोन्ही रुग्णालयांच्या जागेचा प्रश्न सुटल्याची माहिती त्यांना दिली. वावे रुग्णालयाच्या संदर्भातील सर्व प्रश्न आधीच मार्गी लागले असून इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मागील बैठकीत दिलेले असल्यामुळे आता ही सर्व रुग्णालये सुसज्ज उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोन्ही ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्याबाबत ठराव करून घेऊन त्या शासनाच्या नावावर करून घेण्याची जबाबदारी आ. जाधव यांनी विधानभवनात झालेल्या बैठकीत घेतली होती. त्यानुसार संबंधितांशी संपर्क साधून त्यांनी आपले काम आधीच सुरु केले होते. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांच्या जागांचा प्रश्न देखील मार्गी लागण्यास आता कोणतेही अडथळे नाहीत, असे डॉ. कंदेवाड यांनी सांगितले.

विरोधी पक्षाचा आमदार असतानादेखील आमदार भास्कर जाधव यांचा प्रशासकीय यंत्रणेवर असलेला वचक वेळोवेळी पाहायला मिळतो. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून मंत्रालयस्तरावरील सचिवांपर्यंत सर्वांमध्ये त्यांच्याविषयी असलेली आदरयुक्त भीती यामुळे कितीही मोठा प्रश्न समोर आला तरी तो ते सहजपणे सोडवतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा यानिमित्ताने आला.या पाहणीवेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कांबळे, डॉ. बळवंत, चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.