चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, ईडीकडून होणारी अटक तूर्त टळली

256
p chidambaram

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीकडून होणारी अटक तूर्त टळली आहे. याप्रकरणी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अटकपूर्व जामिनावर आज शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना सोमवारपर्यंत अटक करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे आता याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. चिदंबरम सध्या सीबीआय कोठडीत असून त्याप्रकरणी मात्र सर्वोच्च न्यायालायने हस्तक्षेप केला नाही.

सीबीआय कोठडीविरोधातही चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना 21 ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली होती. आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळा प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

एअरसेल मॅक्सिस घोटाळाप्रकरणी 3 सप्टेंबरपर्यंत अटक नाही
एअरसेल मॅक्सिस आर्थिक घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टाने चिदंबरम आणि त्यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांना 3 सप्टेंबरपर्यंत अटक करू नये असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. सीबीआय आणि ईडीने एअरसेल मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक करण्याची परवानगी हायकोर्टाकडे मागितली आहे. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यास मात्र हायकोर्टाने नकार दिला.

चिदंबरम यांचे वकील काय म्हणाले?
न्याय मिळवणे हा चिदंबरम यांचा मूलभूत अधिकार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले जात आहे ते सर्व अस्वस्थ करणारे असल्याचे सिब्बल म्हणाले. हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायाधीश गौर यांना एक नोट दिली होती. त्यावर उत्तर देण्याचीही संधी आम्हाला मिळाली नाही.

ईडीच्या वतीने मेहता यांनी काय बाजू मांडली?
ईडीच्या वतीने बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सिब्बल यांना मध्येच थांबवून खोटे बोलू नका, मी न्यायाधीशांना अशी कोणतीही नोट दिली नव्हती असे स्पष्ट केले. तसेच सिब्बल यांनी याप्रकरणी व्यक्त केलेल्या नाराजीवर आक्षेप नोंदवत आमच्याकडे विविध प्रकारचे पुरावे असल्याचा दावाही केला. यावर सिब्बल यांनी शपथेवर तुम्ही असा दावा करू शकता का, असा सवाल केला.

तपासात सहकार्य करत नाहीत – तुषार मेहता
सीबीआयचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी चिदंबरम तपासात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगितले. याला सिब्बल यांनी विरोध दर्शवला आणि सीबीआयच्या प्रश्नांना त्यांना हवी तशी उत्तरे न देणे याला असहकार्य म्हणता येणार नाही. तसेच सीबीआयकडे प्रश्नच तयार नाहीत मग त्यांना चिदंबरम यांची कोठडी का हवी आहे, असा सवालही केला.

आपली प्रतिक्रिया द्या