
सामना प्रतिनिधी । मुंबई
शक्ती मिल बलात्कार प्रकरणी दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात यावी यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 3 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून खंडपीठासमोर सरकारची बाजू ठामपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. दीपक साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंड येथे 22 ऑगस्ट 2013 साली विजय जाधव, मोहम्मद बेंगाली, मोहम्मद अंसारी आणि सिराज खान या नराधमांनी महिला छायाचित्रकारावर बलात्कार केला होता. त्यापैकी सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित इतर आरोपींना सत्र न्यायालयाने एप्रिल 2014 साली फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कलम 376 (ई) या कायद्यात सुधारणा करण्यात आली असून संबंधित आरोपीने दोन वेळा बलात्कार केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींनी या सुधारणेला हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर या आरोपींना सत्र न्यायालयाने ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा कायम राहावी यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिकेद्वारे अर्ज केला आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.





























































