शिवसेनेतून गद्दारी करून बाहेर पडलेल्या मिंधे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच सुनावणी घेणार आहे. गद्दार आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेने आव्हान दिले आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. त्यामुळे दोन आठवडय़ांनी सर्वप्रथम शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी होईल.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिंधे गटाच्या 16 गद्दार आमदारांना अपात्र केले नाही. नार्वेकर यांचा हा निर्णय पूर्णपणे बेकायदा व विपृत आहे, असा दावा करीत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आली. यावेळी शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अॅड. देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. यावेळी शिवसेनेने सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याचे निदर्शनास आणण्यात आले. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने दोन आठवडय़ांनी सुनावणी निश्चित केली.
वेळीच फैसला होणार
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच शिवसेनेचे म्हणणे पूर्णपणे ऐपून घेऊन हे प्रकरण राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवले होते. तसेच सध्याच्या आव्हान याचिकेशी संबंधित सर्व कागदपत्रे व युक्तिवादाच्या नोट्स कोर्टाकडे सादर केलेल्या आहेत. अशा प्रकारे शिवसेनेची याचिका सुनावणीसाठी पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे न्यायालय आमच्या याचिकेवर वेळीच निकाल जाहीर करेल, असा विश्वास शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केला. त्यांनी मंगळवारी सुनावणीला ऑनलाईन हजेरी लावली होती.
अजित पवार गटाला तीन आठवडय़ांची मुदत
अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालयाने अजित पवार गटाला अपात्र का करू नये, असा सवाल केला होता. याबाबत उत्तर सादर करण्यास अजित पवार गटाला न्यायालयाने आणखी तीन आठवडय़ांची मुदत दिली.