पारा उकळला रस्ता वितळला; ठाण्याची भट्टी झाली! आता धोका उष्माघाताचा

1000

कोरोनाने थैमान घातल्यामुळे सगळेच आपापल्या घरात चिडीचूप बसले असतानाच आता कोरोना सोबत बाहेर आणखी एक धोका टपून बसल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला. हा धोका आहे उष्माघाताचा. गेल्या चार दिवसांपासून पारा 37 पार गेल्याने ठाणेकरांची अक्षरशः भट्टी झाली आहे. रस्तेही वितळत चालले असून या अतिउष्णतेमुळे उष्माघाताने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी धोक्याची घंटाच डॉक्टरांनी वाजवली आहे. त्यामुळे आधीच कोरोना, घर के बाहर निकलो ना असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गेल्या चार दिवसांपासून उष्णतेमुळे उन्हाचा पारा उकळू लागला आहे. स्कायमेट वेदरनेही गेले तीन दिवस ठाण्याचे तापमान 36 अंश पार गेल्याची नोंद केली आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता ठाण्याचे तापमान 37 अंशांवर गेल्याची आकडेवारी स्कायमेटने जाहीर केली आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका रस्त्यावर भटकणाऱ्यांना बसण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

डोकेदुखी, बेचैनी आणि डीहायड्रेशन
आधीच रस्त्यावर विनाकारण भटकणे कोरोना निमंत्रण देणारे ठरेल, असे मत डॉक्टर दीपक वजाळे यांनी व्यक्त केले. कडक उन्हामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे ताप येणे, डोकेदुखी, बेचैनी, शरीरातील पाणी कमी झाल्याने डीहायड्रेशन, चक्कर येणे ही लक्षणे वाढतात. उन्हात भटकल्याने रक्त घट्ट होऊन श्वास घेण्यासही त्रास होतो. हृदयाची धडधड वाढणे यामुळे उष्माघात होऊ शकतो, असे डीएमटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तित आणखी घसरण होण्याचा धोका दहा पटीने वाढू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या