‘नवतपा’च्या सुरुवातीलाच राज्यभर उष्णतेची लाट, ‘ब्रम्हपुरी’ संपूर्ण देशात ‘हॉट’, सर्वाधिक 47.6 अंशांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षभरातील सर्वात उष्ण नऊ दिवस मानले जाणाऱ्या ‘नवतपा’ची सुरुवात सोमवारी अत्यंत उष्ण चटक्यांनी झाली. विदर्भासह संपूर्ण राज्यभरात उष्णतेची लाट धडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच दिवशी ब्रम्हपुरीमध्ये देशातील सर्वाधिक 47.6 अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या बहुतांश भागाचा पारा 45 अंशांच्या घरात गेल्यामुळे नागरिकांची प्रचंड लाहीलाही झाली आहे. मुंबईतही तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असले तरी दमट हवामान आणि आर्द्रतेमुळे नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागला.  

मागील महिनाभर नागपूरसह विदर्भात तीव्र उष्णता आहे. ‘नवतपा’ची सुरुवात होताच येथील उष्णतेची लाट आणखी तीव्र बनली आहे. गेले आठवडाभर उच्चांकी तापमान नोंद होत असलेल्या ब्रम्हपुरीमध्ये उष्णतेने अक्षरशः कहर केला आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी ब्रम्हपुरी येथे 47 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. हे भयंकर तापमान अनेकांच्या जिवावर बेतत असल्याने चिंता वाढत आहे.

मागील 48 तासांत नागपुरात उष्मघाताने 5 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी नागपूरमध्ये 46.5, गडचिरोली 46.4, चंद्रपूर 46, गोंदिया 46,1, वर्धा 46, अकोला 45, अमरावती 45, यवतमाळ 44.5, वाशिम 43.5 अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागांतही उष्णतेची लाट धडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे नकोसे झाले असून त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. पुढील आठ दिवसांत ‘नवतपा’चा कहर कायम राहणार असल्याने नागरिक चिंतेत आहेत.  

मुंबईकरांना 38 अंशांचे चटके

मुंबई शहर आणि उपनगरांतही ‘नवतपा’च्या काळातील तीव्र उष्णतेचे चटके बसण्यास सुरुवात झाली. सोमवारी मुंबईच्या काही भागांत 38 अंशांची नोंद झाली. सांताक्रूझ पेंद्रावर 35.1 आणि पुलाबा केंद्रावर 35.3 अंश तापमान नोंदवण्यात आले. याव्यतिरिक्त राम मंदिर येथे 38.1, विक्रोळी-35.3, विद्याविहार 34.7, दहिसर 34.4 आणि टाटा पॉवर चेंबूर येथे 34.3 अंशावर पारा गेला होता. या तापमानवाढीने मुंबईकर प्रचंड हैराण झाले आहेत.