
थोडं काम केलं तरी श्वास घ्यायला त्रास होतो, अशा समस्या हल्ली वारंवार अनेकांना भेडसावतात. श्वास घेण्यास अडचणी जाणवत असल्यास बरेच आजार उद्भवू शकतात. श्वसनाशी संबंधित समस्येकडे दुर्लक्ष करणे आरोग्यावर बेतू शकते; म्हणून या समस्येवर त्वरीत उपचार होणं आवश्यक आहे.
धाप लागणं किंवा श्वासोच्छावास अतिशय वेगाने होणे ही समस्या हल्ली अगदी सामान्य झाली आहे. वयस्कर लोकच नाहीतर तरुण मुलं सुद्धा या समस्येमुळे त्रस्त झालेली पाहायला मिळतात. घरात किंवा कार्यालयात काम करताना, प्रवासात, पायऱ्या चढ-उतार करताना, थोडी शारीरिक हालचाल केली किंवा काम केले तरी श्वासोच्छावास तीव्र गतीने सुरू होणं, ही श्वसनविकाराची एक समस्या आहे. याशिवाय जेवणात बाहेरील एखादी वस्तू पोटात गेल्यास अस्वस्थपणा जाणवून श्वासोच्छावासाचा त्रास होऊ शकतो. अशावेळी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच समस्या ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेता येईल. यावर एसीआय खंबाला हिल हॉस्पिटलचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. श्याम थम्पी यांनी श्वसनासंबंधीच्या त्रासांची माहिती दिली आहे.
श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या या समस्येकडे अनेक लोक लक्ष देत नाहीत. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत जाते. श्वास घेण्यास त्रास जाणवणाऱ्या अन्य समस्या पुढीलप्रमाणे आहेत.
ब्रॉंकायटीस अस्थमा – श्वास घेताना त्रास उद्भवण्याची अनेक कारणं आहेत. यात ब्रॉंकायटीस अस्थमा (दमा) असल्यास रूग्णाला वारंवार थाप लागू शकते. फुफ्फुसातील वायू नलिकांमध्ये सूज येण्यामुळे दम्याची समस्या जाणवते. हवा श्वसनमार्गात अडकून पडते. त्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ लागतो. अशावेळी रूग्णाला दम लागतो, खोकला येऊ लागतो आणि छाती भरून आल्यासारखी वाटते. दम्याने पिडीत असणाऱ्या रूग्णांनी इन्हेलरचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्यांना दम्यापासून आराम मिळू शकतो.
फुफ्फुसाचा आजार – ‘क्रॉर्निक ऑब्स्ट्रक्विव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) हा एक फुफ्फुसाचा आजार आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन आणि प्रदूषणामुळे होणारी ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे श्वास घेण्यास अडचण जाणवते. धुरामुळेही हा आजार होऊ शकतो. म्हणून सिगारेटचं सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यासह निरोगी व्यक्तीला सुद्धा या आजाराचा सामना करावा लागू शकतो. सीओपीडी या फुफ्फुसाच्या विकाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांवर अँण्टिबायोटिक औषधांद्वारे उपचार दिले जातात. याशिवाय शरीरात ऑक्सिजनच कमतरता असणाऱ्या रूग्णाला ऑक्सिजन दिल्याने मदत होऊ शकते.
अनेक वर्षांपासून श्वसनाच्या विकाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णाला अतिदक्षता विभाग, इंट्युबेशन आणि व्हेंटिलेटर याचे आवश्यकतेनुसार मूल्यांकन करणं गरजेचं आहे.
न्यूमोनिया – या आजारातही तीव्र श्वसनाची समस्या दिसून येते. यात काही दिवस ताप येणं आणि खोकला जाणवतो.
कोरोनरी आर्टरी डिसीज – हृदयाशी संबंधित हा आजार असल्यास किंवा अंजिओप्लास्टी झाली असेल तर श्वसनाची तीव्र समस्या होऊ शकते.
कर्करोग – कर्करोग हा शरीरातील कुठल्याही भागात होऊ शकतो. कर्करोगाने पीडित असणाऱ्या रूग्णाचा आजार फुफ्फुसापर्य़ंत पसल्यास श्वास घेण्यास अडचण जाणवू शकते. कर्करूग्णांमध्ये श्वसनाची समस्या उद्भवल्यास ती त्वरीत ओळखणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.


























































