
सामना प्रतिनिधी । पिंपरी
मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार हजेरी लावली. गारा, मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. विविध भागांत झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. सखल भागात पाणी साचल्याने गटारे तुंबल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या. दरम्यान, पावसामुळे शहराच्या विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे हाल बेहाल झाले.
पिंपरी-चिंचवड शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. नागरिकांना उकाडा जाणवत होता. साडेतीनच्या सुमारास गारांसह पाऊस सुरू झाला. पावसाच्या दमदार हजेरीने नागरिक सुखावले. लहान मुलांनी पावसात भिजण्याबरोबरच गारा वेचण्याचा आनंद लुटला. शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन विभागाने घटनांची माहिती मिळताच तत्काळ रस्त्यांवरील झाडे हटविण्याची कारवाई केली. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी वाहतुकीला अडथळा झाला नाही.
पिंपरीतील मिलिंदनगर येथे गटारे तुंबल्यामुळे पहिल्याच पावसात पाणी घरामध्ये शिरले. त्यामुळे ‘पाणी घरात आणि रहिवासी दारात’ अशी परिस्थिती दिसून आली. नाले स्वच्छ झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी मान्सूनपूर्व पावसातच तो खोटा ठरला आहे.

































































