मालवणात पावसाचा कहर : रस्ते, शेती पाण्याखाली अनेक गावे जलमय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सर्वत्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर मालवणातही कायम आहे. कालावल व कर्ली खाडी तसेच गड नदीला महापूर आला असून लगतची गावे पाण्याखाली गेली आहेत. संपूर्ण तालुकाच जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून लाखोंचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठाही खंडित झाला असून शहरासह सर्वच गावे अंधारात आहेत.

दरम्यान, पावसाचा जोर वाढतच असल्याने पाणी ओसरण्याची शक्यता कमी आहे. किनाऱ्यावर जोरदार लाटा धडकत असून देवबाग, तारकर्ली, तळाशील किनारपट्टी हादरून गेली आहे. तसेच नद्या पुररेषा ओलांडून वाहत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत.

मसुरे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. तर तारकर्ली-देवबाग मार्गावर खाडीचे पाणी सुमारे तिनफुट रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतूक बंद झाली. कोईल, चिंदर, बांदिवडे, काळसे, धामापूर, आंबेरी या भागात पूर स्थितीमुळे घरे व परिसर तीन ते चार फूट पाण्याखाली गेला आहे.

मालवणात गेले तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या व पडझडीच्या घटना घडत आहेत. आज सकाळी मालवण भरड भागातील राजन पांजरी यांच्या घरावर जांभूळचे मोठे झाड कोसळल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. तर यावेळी घराच्या छप्पराचे कौल अंगावर पडल्याने सरिता पांजरी या जखमी झाल्या.

घरावर झाड पडले ; कुटुंब बचावले
शहरातील भरड भागात राहणाऱ्या राजन व विनोद पांजरी यांच्या घरावर जांभूळचे मोठे झाड कोसळले. यावेळी घरात राजन व विनोद पांजरी, त्यांच्या ९० वर्षीय आई, तसेच दोघांच्याही पत्नी व दोन मुले होती. छप्परावर कोसळलेल्या झाडामुळे छप्परावरील कौल घरातील सरिता पांजरी यांच्या अंगावर पडल्याने त्यांना दुखापत झाली. यात घराचे छप्पर तुटले तर एक भिंतही कोसळली. घराच्या लगत वीज पोल असल्याने झाड पडून वीज वाहिन्याही तुटून पडल्या. याबाबत माहिती मिळताच या प्रभागाचे नगरसेवक यतीन खोत यांनी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. वीज वाहिन्या तुटून पडल्याने या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यासाठी खोत हे वीज वितरण कार्यालयात माहिती देण्यास गेले असता वीज कार्यालयाच्या तक्रार कक्षाला टाळे लावल्याचे दिसून आले. यावेळी खोत यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत भरड भागातील वीज पुरवठा बंद करून घेतला. त्यानंतर झाड हटविण्याचे काम करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ताडपत्री उपलब्ध करून दिली. या दुर्घटनेमुळे पांजरी यांच्या घराचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

खोतजूवा बेटावर आजही धोका कायम
कालावल खाडीपात्रात असलेल्या खोतजूवा बेटावर पुराचे पाणी घुसले असून सलग तिसऱ्या दिवशी येथील घरांना पाण्याचा वेढा कायम होता. अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. नदीला असलेल्या पुराचा जोर पाहता घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी तहसील प्रशासनास माहिती दिली असून आपत्ती विभाग लक्ष ठेवून आहे.