
दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या गणरायाला आज पावसामुळे भलतेच खोळंबून राहावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने ठाणे, रायगड, पालघरात मुसळधार ‘विघ्न’ घालत गणेशभक्तांच्या उत्साहाचाच ‘बाप्पा मोरया’ केला. त्यामुळे दुपारनंतर श्रींच्या विसर्जनासाठी निघालेल्या भक्तांना पावसाचा सामना करावा लागला. दुसरीकडे ठाण्यासह भिवंडी, वसई, विरारमध्ये रस्ते जलमय झाले. भिवंडीत विसर्जन घाटच वाहून गेला. वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने एकाच ठिकाणी तीन तास वाहतूक ठप्प झाली. तर वसईमध्ये नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने दीड फूट पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.
नालासोपारातील रस्ते पाण्यात
वसई – धुवाधार पावसामुळे नालासोपाऱयात रस्त्यांवर दीड ते दोन फूट पाणी साचले होते. गटारे तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसले. नालासोपारा पूर्व येथील सखल भागात गुडघाभर पाणी साचल्यामुळे वसई-विरार महापालिकेचे नालेसफाईचे सारेच दावे फोल ठरले. नालासोपारा उड्डाणपुलाखाली, आचोळा, गालानगर आदी परिसरातही मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. वसई-विरारसह संपूर्ण पालघर जिह्यात पावसाची संततधार राहिल्याने दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनात मोठे अडथळे निर्माण झाले. वसई-विरार महापालिका क्षेत्रात 12 हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जन घाट बुडाला
भिवंडी – पावसाचा जोरदार तडाखा ठाणे, भिवंडी, कल्याण, वसई परिसराला बसला. भिवंडी परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. कामवारी नदीला पूर आल्याने नदीनाका येथील गणेश विसर्जन घाट पाण्याखाली गेला. शिवाय काळू, उल्हास, वालधुनी नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने जिल्हा प्रशासने सतर्कतेचा इशारा देत दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा आधार घेण्याचे आवाहन केले. भिवंडीतील नदीनाका शेलार येथे रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. भिवंडी – वाडा महामार्गावर तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने प्रवाशांसह गणेशभक्तांचे प्रचंड हाल झाले. शेलार ग्रामपंचायत हद्दीतील सखल भागात असलेल्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
कल्याण, डोंबिवलीकरांना पुराची धास्ती
कल्याण- दोन दिवसांपासून कल्याण, डोंबिवली परिसरात पुन्हा पावसाची तीव्रता वाढल्याने नागरिकांनी पुराची धास्ती घेतली आहे. काळू, उल्हास, मोथली, वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पत्रीपुलावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने सर्वांची त्रेधा उडाली.
रायगडला सतकर्तेचा इशारा
अलिबाग – जिह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून ऐन गणेशोस्तव काळात गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले. पुढच्या 24 तासांत जिह्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमाराना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
भक्तीचा महापूर
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा गजरात ठाणे, रायगड, पालघर जिह्यांत दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. दिवसभर पावसाची संततधार असतानाही भक्तीचा महापूर कुठेही कमी दिसला नाही. सायंकाळनंतर पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. पावसात श्रींची मूर्ती भिजू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. कुणी छत्री धरत तर कुणी रेनकोटचा आधार देत बाप्पाचे संरक्षण करण्याची धडपड करत होता. ठाणे शहरात दीड दिवसाच्या 4 सार्वजनिक तर 40 हजार 590 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पालघर जिह्यात 32 हजार तर रायगड जिह्यात 23 हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर आणि बालगोपालांसह अबालवृद्धांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात गणेश विसर्जन सोहळा पार पडला.





























































