
गोव्यात मुसळधार पावसाचे विघ्न सुरुच असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. डिचोलीमध्ये पुराचा धोका असून साळ, मेणकुरेसह इब्रामपुर भागात प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. केरी व महाराष्ट्रातील विर्डी भागात काल दुपारी कोसळलेल्या पावसामुळे डिचोली तालुक्यातील साखळी येथील वाळवंटी नदीला पूर आला. नदीच्या पाण्याने 5.50 मीटरची उंची गाठली होती. सांयकाळी पूर थोडा ओसरला असला तरी वाळवंटी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
पणजीत 24 तासात 41 मि.मी. तर दिवसभरात आणखी 1 इंचची भर पडल्याने एकूण पाऊस 134 इंच एवढा झाला आहे. आतापर्यंत हा 37.5 इंच अतिरिक्त पाऊस ठरला आहे. अंजूणे धरण क्षेत्रात आतापर्यंत 197 इंच पाऊस पडला असून 2006 च्या विक्रम मोडण्याच्या स्थितीत आहे. राज्यात पावसाचा जोर कायम असून आगामी 24 तासांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पुढील आठ दिवस पावसाचा जोर असाच राहिल असाही अंदाज आहे.
दरम्यान,दूधसागर-सोनावळी रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या शिवाय निजामुद्दीन एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन वळवण्यात आली आहे. चोर्ला घाटात देखील काल दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.




























































