
अलिबाग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असून ऐन गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मात्र, हा पाऊस शेतीसाठी फायद्याचा आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोमवारी रात्रीपासून पावसाने जोरदार सुरुवात केली असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यात सगळीकडे पावसाने सुरुवात केली असल्याने गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांचा हिरमोड झाला आहे. येत्या 24 तासात जिल्ह्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमाराना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तर जिल्हा प्रशासनाकडूनही नदी व समुद्र किनारी गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात 3 सप्टेंबरपर्यत एकूण 61316.41 मिमी पाऊस पडला असून सरासरी 3832.28 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यत जिल्ह्यात 121.94 टक्के पाऊस पडला आहे. 3 सप्टेंबर रोजी उरण तालुक्यात सर्वाधिक 176 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अलिबाग 121 मिमी, पेण 45 मिमी, मुरुड 69 मिमी, कर्जत 20.60 मिमी, खालापूर 7 मिमी, माणगाव 92 मिमी, रोहा 78 मिमी, सुधागड 46 मिमी, तळा 71 मिमी, महाड 40 मिमी, पोलादपूर 43 मिमी, म्हसळा 92 मिमी,श्रीवर्धन 110 मिमी, माथेरान 57 मिमी पाऊस पडला आहे.
























































