
बीड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी रस्ते,पूल वाहून गेल्याचे तसेच काही गावांचा संपर्क तुटल्याचेही वृत्त आहे. याबाबत प्रशासन स्तरावर अधिकृत माहिती घेत असून आवश्यक तिथे तातडीने मदत पोहोचण्याच्या सूचना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
बीड जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास वॉर रूम व फोन-इन मदत केंद्र सुरू करावे व सर्व 11 तहसिलदारांनी दर तासाला जिल्हा वॉर रूममध्ये तालुक्यातील अपडेट्स द्यावेत अशाही सूचनाही त्यांनी केल्या आहेत. मदत केंद्र व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात येत आहे. तुटलेले,वाहून गेलेले रस्ते,पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील. कृपया कोणीही वाहत्या नद्या, जलाशय आदी धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पूर परिस्थिती आटोक्यात येताच शेतकऱ्यांना दिलासा व नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यात तीन तलाव फुटले
गेवराई तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून गेवराई तालुक्यातील मारफळा,भेंड आणि जातेगाव येथील तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि तब्बल गेवराई तालुक्यात तीन तलाव फुटले आहेत.
गेवराई तालुक्यात गेल्या-चार दिवसापासून पावसाची संततधार असल्यामुळे तालुक्यातील पूर्ण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून ओसांडून वाहत आहेत. शेकटानंतर मंगळवार रोजी तीन तलाव फुटले त्यामध्ये मारफळा, जातेगाव ,भेंड या तलावाचा समावेश आहे. मनुष्यहानी झाली नसली तरी पिकाचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर मारफळा तलाव फुटल्यामुळे सुडी, चोपडयाची वाडी या व काही गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

































































