चंदगड तालुक्यात पावसाची संततधार; अनेक बंधारे पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदगडमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक बंधारे शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेले आहेत. ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोकरे, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, कोवाड तर घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर, भोगोली, हिंडगाव, कानडी, अडकूर यावरील बंधारेही पाण्याखाली गेल्याने गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होऊन सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

चंदगड तालुक्यात गेल्या 24 तासात सरासरी 105 मिलीमीटर तर आतापर्यंत 1735.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच चंदगड तालुक्यातील 23 पैकी 18 धरणे ओव्हरप्लो झाली आहेत. नदी काठारील ऊस, भात व इतर पिकेही कुजून गेली आहेत. पूर ओसरल्यावर पिक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हेरे येथील सिंधू तानाजी नाईक, जंगमहट्टी येथील संभाजी शंकर गावडे, कलिवडे येथील पांडुरंग कदम यांच्या घराच्या भिंती पडल्या आहेत. तर तानबा कदम यांचे पत्राशेड पडले आहे. रामा गणू कांबळे यांच्या घराचे छप्पर कोसळले आहे.