
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास इरई नदीमुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.