
नगर शहर व जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी काहीसा कमी झाला असला, तरी तुरळक पावसाच्या सरी कोसळतच होत्या. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे व राहाता या पाच तालुक्यात आतापर्यंत शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक 247 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रवरा, गोदावरी, भीमा, घोड व मुळा नदीत विसर्ग सुरूच आहे.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत 105 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी व बुधवारी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. मंगळवारी दमदार पावसामुळे नगर शहरातून जाणारी सीना नदी देखील दुधडी भरुन वाहत होती. जिल्ह्यातील नद्या देखील या पावसामुळे वाहत्या झाल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून नगर शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. बुधवारी सकाळी पाऊस थांबला होता. दुपारी दोन वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. गुरुवारी दुपारी शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर कडक ऊन पडले होते. शहर व परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी ग्रामीण भागात मात्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. मंगळवार व बुधवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक नद्या, नाले, ओढे वाहते झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 105 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस 247 टक्के पाऊस अकोले तालुक्यात झाला आहे. कोपरगाव 122 टक्के, नेवासे 118 टक्के, संगमनेर 120 टक्के, राहुरी 97 टक्के, श्रीरामपूर 111 टक्के, राहाता 104 टक्के, नगर 93 टक्के, शेवगाव 84 टक्के, पाथर्डी 78 टक्के, पारनेर 92 टक्के, श्रीगोंदे 89 टक्के, जामखेड 74 टक्के व सर्वात कमी कर्जत तालुक्यात 50 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अकोले 247 टक्के सर्वाधिक पाऊस झाला आहे. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे व राहाता या पाच तालुक्यांत आतापर्यंत शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे भंडारदरा धरणातून दुपारी प्रवरा नदीत 1 हजार 423 क्युसेक, निळवंडे धरणातून 3 हजार 145 क्युसेक, ओझर बंधार्यातून 6 हजार 301 क्युसेकने विसर्ग सुरू होता. गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर बंधार्यातून 33 हजार 576 क्युसेस, भीमा नदीत दौंड विसर्गातून 41 हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले. मुळा नदीतही मुळा धरणातून 2 हजार 500 क्युसेसने विसर्ग सुरू होता.
गुरुवारी दुपारी झालेल्या पावसामुळे वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागली. नगर शहर व परिसरात दिवसभर ऊन, सावली व पावसाचा खेळ सुरू होता. कडक उन्हाळ्यासारखे ऊन पडायचे, नंतर अचानक सावल्या व पावसाला सुरुवात होत होती.
































































