मुंबई-ठाण्यात पावसाने हवामान खात्याला गंडवलं, कोकणात मुसळधार पाऊस

मुंबई, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडणार असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा इशारा सपशेल खोटा ठरला आहे. काही मिनाटासाठी पडलेल्या किरकोळ सरी सोडल्या तर मुंबई आणि आसपासच्या परिसरात कुठेही पाऊस झालेला नाही. हवामान खात्याने दिलेल्या अलर्टमुळे मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मेसेज पाठवण्यात आले होते. “भारतीय हवामान खात्याने आपल्या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे” असा संदेश नागरिकांना देण्यात आला होता. मात्र नेहमीप्रमाणे पावसाने हवामान खात्याने गंडवलं आणि हवामान खात्याचे रेड अलर्ट खोटा ठरला.

कोकणात मात्र मुसळधार पाऊस पडत असून सिंधुदुर्गात पडत असलेल्या पावसाचा फटका राज्य महामार्गाला बसला आहे. फोंडा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. फोंडा घाट मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. ही दरड सकाळच्या सुमारास कोसळली त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या वतीने दरड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी माघारी फिरणे पसंत केले. वैभववाडी, कणकवली तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

1 दिवसांत 10 दिवसांचा पाणीसाठा जमा झाला

गुरुवारी मुंबई आणि उपनगरात तसेच ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाच शिवाय अवघ्या एका दिवसात मुंबईला 10 दिवस पाणी पुरवठा करता येईल इतका पाणीसाठाही जमा झाला. ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेला होता. या काळात धरणक्षेत्रातही पाऊस झाला नव्हता. 7 सप्टेंबरपासून राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस झाला होता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 24 तासांत 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे 41 हजार दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये एकूण 93 टक्के पाणीसाठा जमा आहे. या महिन्यात चांगला पाऊस झाला तर मुंबईची वर्षभराची पाणीसमस्या सुटण्यास मदत होईल.