पावसाने उडवली दाणादाण! दरडी कोसळल्या, वाहतुकीला ब्रेक, अनेक ठिकाणी पाणी भरले

380
मंगळवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला.

मुंबईत सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण दिवस-रात्र अक्षरशः झोडपून काढल्याने मुंबईची दाणादाण उडाली कांदिवली येथील हायवेसह अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्या, रस्ते खचले. झाडे-झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या. मुसळधार पाऊस सुरू असतानाच समुद्रालाही उधाण आल्याने अनेक भागांत पाणी साचले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीला ब्रेक लागला. पावसाच्या या रौद्रावतारामुळे खासगी-शासकीय कार्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईसह संपूर्ण राज्यात आजदेखील मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. यानुसार पहिल्या दिवसापासून पावसाने बरसायला सुरुवात केली. पावसाचा जोर इतका जास्त होता की रात्रीपासून दुपारपर्यंत तब्बल 250 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. यामध्ये किंग्ज सर्वल, हिंदमाता, गांधी मार्केट अशा अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होती. आज व उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणेला सुसज्ज क सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कांदिवलीत दरड कोसळली, वाहतूक ठप्प

कांदिवली येथील द्रूतगतीमार्गावर मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. सकाळची वेळ असल्याने या मार्गावर फारशी वाहतुकीची वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावर माती व दगडाचा ढीग साचला. त्यामुळे मिरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प झाली. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान सहा तासानंतर रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवण्यात आला.

आजही मुसळधार, रेस्क्यू टीम तैनात

मुंबईत 6 ऑगस्ट रोजी ही मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असा इशाराही पालिकेने दिला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीकर मुंबईत आवश्यक आणि धोकादायक ठिकाणी एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे.

मुंबईच्या सखल भागात पाणी साचले

किंग्ज सर्वल, गांधी मार्केट, हिंदमाता, दादर, प्रभादेवी, खोदादाद सर्कल, अंधेरी सबके, मिलन सबवे, चेंबूर शेल कॉलनी, वडाळा, कुर्ला, वांद्रे,  मालवणी म्हाडा कॉलनी,  ऍन्टाप हिल, संगमनगर, सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोड, चुनाभट्टी, सांताक्रुझ, वाकोला, अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली. दहिसर, परळ, वरळी आदी ठिकाणी पाणी साचले.

मुंबई शहरातील 29 ठिकाणी, पश्चिम उपनगरातील 56 तर पूर्व उपनगरातील 15 अशा एकूण 100 ठिकाणी झाडे आणि फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झाले नाही. झाडे आणि फांद्या उचलण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मुंबईत 10 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात शहरात पाच, पूर्व उपनगरात एक तर पश्चिम उपनगरातील चार ठिकाणी  शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झाले नाही.

पावसाची नोंद

कुलाबा       252.2 मिमी

सांताक्रुझ    268. 6 मिमी

संध्याकाळी 6 काजेपर्यंत पडलेला पाऊस-

शहर          21.28 मिमी.

पूर्व उपनगर   23.64 मिमी

पश्चिम उपनगर        24.65 मिमी

अरबी समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली

गोराई गावातील मच्छीमारांची लकी स्टार ही बोट आज परतत असताना अरबी समुद्रात बुडाली. या बोटीवरील 13 पैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन जणांचा शोध सुरु असून याची माहिती तटरक्षक दल, नौदलाला देण्यात आली आहे.

गोराई मधील मच्छीमार हे 1 ऑगस्टला लकी स्टार या बोटीने मासे पकडण्यासाठी अरबी समुद्रात गेले होते. आज पाऊस असल्याने बोट पुन्हा गोराई येथे येत होती. सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास अचानक बोट बुडाली. हा प्रकार उत्तन येथील एका बोटीवरील मच्छिमाराने पाहिला. लकीस्टार बोटीवरील 13 पैकी 11 जणांना वाचवले. या घटनेची माहिती गोराई पोलिसांना मिळाली. बुडालेल्या दोघांचा शोध तटरक्षक दल, नौदलाकडून घेतला जात आहे. नेमकी बोट कशी बुडाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे हाल

सोमवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु राहिल्याने रस्ते व तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशिर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीकर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याने मिळेल त्या वाहनांनी कामाच्या ठिकाणी  पोहचण्याचा प्रयत्न केला. रेल्वे बंद असल्याने काहींनी बसेसचा आधार घेतला. मात्र बसेचचे मार्गही वळवण्यात आल्याने कर्मचार्‍यांची धावपळ झाली.

मिठी नदी परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या खाली. मात्र असे असले तरी सावधगिरी म्हणून लगतच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान  बुधवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणेला सुसज्ज व सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेत आवश्यक तेथे तात्पुरत्या निवार्‍यांचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचेही महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी यांनी सांगितले.

दहिसर नदीला पूर

जोरदार पावसामुळे दहिसर येथील दौलत नगर भागातील दहिसर नदीला पूर आला. पालिकेने या भागात सुरक्षेच्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवली होती. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षिततेच्यादृष्टीने इतर ठिकाणी हलवले

आपली प्रतिक्रिया द्या