मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, NDRF च्या 15 टीम तैनात

4965

मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यात NDRF च्या 15 टीम तैनात करण्यात आले आहे. सलग तिसर्‍या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचाही आढावा घेतला आहे. या जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरू आहे.

मुंबईत तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मदनपुरा, भायखळा, हिंदमाता आणि वरळीत पाणी भरले आहे. तसेच चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान आणि मरीन लाईन्स आणि चर्नी रोडदरम्यान ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले होते. त्यामुळे काही वेळेसाठी लोकलची वाहतूक बंद करण्यात आली होती.

हवामन विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नगर, नाशिक भागात रेड ऍलर्ट जारी करण्यात केला आहे.

पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे उद्यापासून धरणातून पाणी सोडले जाईल. नवी मुंबईत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. त्याचा फटका डी वाय पाटील स्टेडियमला बसला. डी वाय स्टेडियममधील अनेक खांब आणि बोर्ड उडून गेले. तसेच मुंबईच्या बीएसई इमारतीवरून साईन बोर्डही खाली कोसळला इतक्या जोरात वारे वाहत होते.

मुंबईजवळील जेएनपीटीमध्ये मोठमोठ्या क्रेन्स कोसळल्या आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. बचावकार्यासाठी राज्यात NDRF च्या 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत त्यापैकी 4 टीम कोल्हापुरात, 2 टीम सांगलीत आणि सातारा, ठाणे पालघर आणि नागपुरात प्रत्येकी एक टीम तैनात आहेत. मुंबईत NDRF च्या 5 टीम तैनातत करण्यात आल्या आहेत.

पावसाचा रोख पाहता लोकल सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. म्हणून पालिकेने चाकरमान्यांसाठी सीएसएमटी ते कुर्ल्यादरम्यान तात्पुरत्या निवार्‍याची सोय केली आहे.

 

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही मुंबईतल्या आजच्या मुसळधार पावसाचा फटका बसला असून ईस्टर्न फ्री वे वर अडकले आहेत.  मुंबईत आज आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते आज सकाळी परळी ( बीड ) हून निघाले होते. मात्र अडकून पडल्याने त्यांना बैठकीला हजर राहता आले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या