
पावसाने आज सकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह बरसायला सुरुवात केल्याने कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. गडगडाटासह कोसळणाऱया पावसाने मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली. राज्यातही अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला. हा परतीचा पाऊस असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचे रिटर्न तिकीट कधी कन्फर्म होणार हे मात्र हवामान खात्याला ठाऊक नाही. त्यामुळे हा पाऊस दिवाळीचे फटाके भिजवूनच जाणार असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस हीच स्थिती राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबईत पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली तरी ढगाळ, दमट वातावरणामुळे मुंबईकर उकाडय़ाने हैराण झाले होते. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तर मध्य आणि हार्बर मार्गावरही रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. दरम्यान, पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गोव्यात पावसाची शक्यता असून हा परतीचा पाऊस नसल्याचे हवामान खात्याचे जयंत सरकार यांनी सांगितले.
राज्यभरात पावसाचे धुमशान
राज्यात सर्वदूर पावसाचा जोर राहिला. सोलापुरात माढा, करमाळा, पंढरपूर भागात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. माढय़ात अनेक भाग जलमय झाले होते. जळगावात मुसळधार पाऊस सुरू असून चाळीसगाव शहरातून जाणाऱया तितुर नदीला पूर आला आहे. नाशिक जिह्यात गिरणा, मन्याड धरणक्षेत्रालाही पावसाने झोडपले. गिरणा नदीलाही पूर आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातही पावसाने दैना उडवली आहे. कोकणात भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ठाण्यात दिवसभरात 55 मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली. विदर्भातील मानोरा तालुक्यातही धोधो पाऊस कोसळत असून चौसाळ्यात बंधारा फुटून मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळमध्येही पावसाने सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान केले.
मुंबईला आज यलो अलर्ट
मुंबईत 8 ऑक्टोबर रोजी ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
असा झाला पाऊस
मुंबई शहर 37.51 मिमी
पूर्व उपनगर 36.38 मिमी
प. उपनगर 25.26 मिमी
पाच दिवस गडगडाटासह बरसणार
आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील किमान पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचीही शक्यता आहे.

























































