
शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार या तीन तालुक्यांत 700 पेक्षा अधिक कुटुंबांना या पावसाचा फटका बसला असून, 300 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांचे, नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. पूर ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत असून पंचनामे सुरू झाले आहेत. तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांना मोठा फटका बसला. दोन तालुक्यांतील सर्वच महसूल मंडळांत नेहमीच्या तुलनेत तब्बल पाच पट अधिक पाऊस झाला. राहुरी, नेवाशातही नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार नगर तालुक्यात पावसामुळे देवगाव, रतडगाव, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या पाच गावांत सात घरांचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यात पावसामुळे घोडेगाव, शिरसगाव, सोनई (धनगरवाडी) या तीन गावांत घरांची अंशतः पडझड झाली. राहुरी तालुक्यात पावसामुळे देसवंडी, राहुरी खुर्द येथे एकूण दोन घराची पडझड झाली.
शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरूर खुर्द, वरूर बुद्रूक, भगुर, वडुले बुद्रूक, लांडे व कराड वस्ती, भागात तब्बल सहाशेपेक्षा अधिक कुटुंबांना फटका बसला. याशिवाय आतापर्यंत 90 जनावरांचा मृत्यू झाला असून 81 जनावरे बेपत्ता आहेत. मृत जनावरांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाथर्डी तालुक्यात पावसामुळे कोरडगाव सोमठाणे, औरंगपूर, पांगोरी पिंपळगाव येथील नदीकाठावरील गावे बाधित झाली आहेत. कोरडगाव गावातील नागरिकांची स्थानिक पथकाच्या साह्याने एकूण 80 कुटुंबाना फटका बसला.
पाथर्डी तालुक्यात पावसामुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या 128 असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. पूर, पावसामुळे कोटय़वधींचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे उघडय़ावर आली आहे. दरम्यान, याबाबतचा सविस्तर पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी; लवकरच योग्य मदत – राज्यमंत्री तनपुरे
शेवगाव तालुक्यात पूर कधीही पाहिलेला नाही. अचानक ढगफुटी झाल्यामुळे अत्यंत दुर्दैवी प्रसंगाचा सामना शेवगावकरांनी केला. या संकटकाळात धीर सोडू नका. या पुरामुळे दहा गावांत झालेले नुकसान हे कधीही भरून निघणार नाही; परंतु शासन तुमच्या पाठीशी आहे. सर्व अधिकारी व त्यांच्या टीम व्यवस्थित पंचनामे करून अहवाल सादर करतील. शासन योग्य पद्धतीने मदत करील, अशी ग्वाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिली.

























































