
सामना प्रतिनिधी, अलिबाग
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे, सखल भागात पाणी साचणे यासारख्या घटना घडल्या आहेत. येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून रुसून बसलेला मॉन्सून अखेर जिल्ह्यात चांगलाच सक्रिय झाला. शुक्रवार पाठोपाठ शनिवारीही पावसाने दमदार बॅटींग केली. पनवेल, पेण, रोहा, महाड, पोलादपुर, अलिबाग, सुधागड पाली येथे पावसाच्या जोर कायम होता. इतर उरण, मुरुड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव परीसरातही पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडित होणे यांसारख्या घटना घडल्या. तर अलिबाग पोस्ट कार्यालयातील इमारतीचा सज्जा पडला असून यात कोणीही जखमी झालेले नाही.
जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी 197. 46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खालापूर येथे सर्वाधिक 385 मिमी नोद झाली. त्या खालोखाल माथेरान 347 मिमी, कर्जत 287.10 मिमी, पेण 280.40 मिमी, पनवेल 271.80 मिमी, रोहा 240 मिमी, माणगाव 196 मिमी, महाड 195 मिमी, पोलादपूर 161 मिमी, तळा 155 मिमी, म्हसळा 145 मिमी, श्रीवर्धन, मुरुड 142 मिमी, सुधागड 120 मिमी तर उरण 98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान येत्या 24 तासांत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
























































