सातारा जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील पंधरवडय़ात दडी मारून बसलेल्या पावसाने जिह्यात पुन्हा एकदा धुमशान सुरू केले आहे. काल रात्रीपासून जिह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू असून, हवामान विभागाने जिह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. जिह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमधील थबकलेल्या पाणीसाठय़ाने पुन्हा एकदा सूर पकडला आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 70 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सातारा जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली होती. प्रामुख्याने धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना, धोम, कण्हेरसह सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा साठ टक्क्यांच्या वर गेला होता. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पाणीसाठा स्थिर झाला होता. मात्र, मागील चार-पाच दिवसांपासून जिह्यात अवकाळी स्वरूपाचा पाऊस बरसू लागला. जिह्याच्या विविध भागांना या पावसाने चांगलेच झोडपून काढले. विशेषतः दुष्काळी तालुक्यांनाही या पावसाने दिलासा देण्याचे काम केले; परंतु धरणांमधील पाणीसाठा वाढण्याच्या दृष्टीने हा पाऊस उपकारक नव्हता. कालपासून मात्र जिह्याच्या पश्चिम भागावर वरुणराजाची कृपादृष्टी झाली. प्रमुख धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीसाठय़ातही झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. कोयना धरणाने 70 टीएमसीचा टप्पा पार केला असून, अन्य धरणांमधील पाणीसाठा आहे 80 टक्क्यांच्या उंबरठय़ावर गेला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन-तीन दिवसांतच विविध धरण प्रकल्पांमधून नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.