
जालना जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशीही जोरदार पावसाने झोडपून काढले असून, जिल्ह्यात छोटे-मोठे ओढे, नदी,नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. निम्न दुधना प्रकल्पात 94.1 पाणीसाठा आहे. अंबड तालुक्यातील कुंभार पिंपळगावात पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात घुसल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत. घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील एका घरावर वीज कोसळल्याने चार जण किरकोळ जखमी झाले. अनेक ठिकाणच्या ओढे-नाल्यांना पूर आल्याने काही काळापासून वाहतूक बंद आहे.
मंगळवारी जालना, मंठा, परतूर, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, अंबड तालुक्यालाही पावसाने जोरदार झोडपून काढले. तर घनसावंगी तालुक्यातील दैठणा ग्रामपंचायत अंतर्गत शिवाजीनगर वस्तीत मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अजिनाथ आव्हाड यांच्या घराजवळ असलेल्या सुबाभळीच्या झाडावर वीज पडल्याने घरात असलेल्या गणेश अजिनाथ आव्हाड, पूजा अजिनाथ आव्हाड, रेणुका दादासाहेब आव्हाड, प्रतीक्षा युवराज आव्हाड यांना विजेचा धक्का बसून किरकोळ भाजल्याची घटना घडली आहे. मंठा तालुक्यात रात्री दहा वाजल्यापासून संततधार पाऊस बरसत होता तो आज दुपारी दोन वाजेपर्यंत पाऊस पडला. ओढे, नदी-नाले भरून वाहत होते. भोकरदन शहरातून वाहणारी केळना नदीला आज पडलेल्या जोरदार पावसामुळे पूर आला असून, नदी खळाळून वाहत आहे.
परतूर शहरात तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने परतूरआष्टी मार्गावरील वाहतूक सातत्याने ठप्प होत आहे. दैठणा फाटा ते येनोरा रस्त्यावरील एका छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा परतूरशी संपर्क तुटत आहे. निम्न दुधना प्रकल्प जलाशयाची पाणीपातळी 426.100 मी.आहे. प्रकल्पात एकूण 94.11 टक्के जिवंत पाणीसाठा आहे. मंगळवारी क्रमांक 2 व 19 हे दोन दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. सध्या क्रमांक 1 व 20 हे दोन दरवाजे 0.60 मीटरने चालू असून, एकूण 4 हजार 320 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. 1 जून ते 7 सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात 823 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णीसह अकोला, देळेगव्हाण, पोखरी,नांदखेडा काचनेरा, किन्ही, कुभारझरी, खानापूर परिसरात काल रात्री दोन वाजेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत जोराचा पाऊस पडला. दुपारी 4 वाजेपासून पावसाने जोर धरला आहे. ढालसखेडा व ताडहादगाव येथील पुलाच्या बाजूने करण्यात आलेला मातीचा भराव बाहून गेल्याने नागरिकांना घनसावंगीकडे येण्यास अंबड, राणी उंचेगावमार्गे घनसावंगी यावे लागत आहे. सुखापुरी तलाव पूर्ण भरला आहे. अंबडतीर्थपुरी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद ओह.
अंबड तालुक्यात मंगळवारी दुपारी एका तासात प्रचंड पाऊस झाला. यामुळे खडकेश्वर बृहत लघु पाटबंधारे प्रकल्प व मुसा भद्रायनी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. मुसा भद्रायनी धरणाच्या खालच्या भागातील सिध्देश्वर पिंपळगावात पुराचे पाणी शिरले. सव्वासहाच्या सुमारास ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात झाली. अंतरवाली सराटी सुकी नाल्याला व नालेवाडी येथील मागणी नदीला महापूर आल्याने संपर्क तुटला आहे. सुखी नाल्याला पूर आल्याने वडीगोद्री – दुनगाव हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. कुंभारपिंपळगाव येथे पाऊण तास झालेल्या अतिवृष्टीने पूर्ण गावात पाणीच पाणी झाले आहे. गावात येणाऱ्या ओढ्याने मागील पंचवीस वर्षांत एवढे पाणी आले नव्हते. अतुल ज्वेलर्स, मुरळे कॉम्प्लेक्स, तापडिया कॉम्प्लेक्स, उढाण कॉम्प्लेक्ससह इतर दुकानात पाणी गेल्याने व्यापाऱ्याचे नुकसान झाले आहे. साठेनगर, पाटीलनगर, बसस्थानक भागात तर नदीचे स्वरूप आले होते.
जिल्ह्यात सरासरी 15.10 मि.मी. पाऊस
जालना : जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासांत सरासरी 15.10 मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जालना- 11.10 (788.60), बदनापूर-5.80 (701.10), भोकरदन- 26.70 (698.30), जाफराबाद 17.10 (668.50), परतूर-15.40 (827.30), मंठा- 18.10 (804.30), अंबड-13.30 (948.10) घनसावंगी – 11.50 (913.00) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. 1 जूनपासून मंगळवारपर्यंत जिल्ह्यात सरासरी 798.00 मि.मी. एवढा पाऊस झाला असून, वार्षिक सरासरी 132.32 टक्के आहे.























































