कोपरगांवला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून जनावरे दगावली 

कोपरगांव तालुक्यात काल पुन्हा अवकाळी पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले, मेंढपाळांची पाल उडून गेले. मौजे बक्तरपुर येथे काल झालेल्या अवकाळी पाऊस व वीज पडून सतीश पांडुरंग कांदळकर यांच्या मालकीच्या तीन मेंढ्या, एक गाय व एक बैल मयत झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी तलाठी, पशुवैद्यकीय डॉक्टर, सरपंच, पोलिस पाटील यांनी भेट देऊन तसेच मौजे वडगाव येथील अशोक भालजी वाकळे यांचे राहते घरावर कालच्या वादळी वाऱ्याने झाड पडल्याने घराचे नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही.  या घटनेचा पंचनामा केला असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.

अचानक सोसायटीच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. याआधी गुरुवार 9 मे रोजी अवकाळी पाऊस होऊन नुकसान झाले होते. हवामानात उष्णतेचा प्रचंड उघडा वाढला,त्यातच पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे अवकाळी पावसाचे तडाखे मार्च, एप्रिल, मे महिन्यांत बसू लागले आहेत. कोपरगांव तालुक्यात शुक्रवारी अक्षयतृ‌तीयेच्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा शहरासह ग्रामिण भागात मोठया प्रमाणांत बसला आहे. तब्बल चाळीस मिनिटे जोरदार वाऱ्यासोबत विजेचा कडकडाटासह पाऊस पडला. 41अंशावर असलेले तापमान थेट 24 अंशापर्यंत उतरले गेले.

शेतकऱ्यांनी काढलेले कांदा पीक झाकून ठेवण्यासाठी त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. अनेक ठिकाणी  वीज खांबाचे नुकसान होऊन तारा पडल्या आहेत. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून संबंधितांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.शुकवारी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता. रस्त्यावर आंबे, भाजीपाला, करा केळी दैनंदिन गरजेच्या वस्तु विक्रेत्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला.

गुरुवारी रात्रीदेखील कोपरगांव तालुक्याच्या पश्चिम भागात वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाउस पडला. हवामान खात्याने तसा अदाज व्यक्त केला होता. अन्य परिसरात अवकाळी पावसामुळे झाडे उन्मळून पडले, निवा-यासाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या प्लास्टिक कापड, पत्रे याचेही नुकसान झाले आहे. सध्या कांदा पिकाचे उत्पादन सुरू आहे. काही शेतक-यांचे पीक शेतातच उघड्यावर आहे तर काही शेतकऱ्यांनी कांदा शाळेत भरून ठेवण्यासाठी ढीग करून ठेवले होते. पण शुक्रवारी आलेल्या पावसामुळे शेतक-याचे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. हवेत गारवा निर्माण झाला पण यामुळे पुढील पावसाचे गणित बिघडवू नये अशीच प्रार्थना बळीराजाने परमेश्वराकडे केली आहे.