मुंबईत 12 तासांत सर्वाधिक 215.8 मिमी पाऊस, पुढील चोवीस तास धोक्याचे

1518

मुंबईकरांनो, सावधान! पुढील चोवीस तास अतिधोक्याचे आहेत. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर  अतिवृष्टीचे ढग दाटले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्य़ांसह अति मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बुधवारी मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्य़ासह 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याने महानगरपालिका व आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रेल्वे, रस्ते वाहतूक अनेक ठिकाणी विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी घराबाहेर न पडणेच योग्य ठरेल असे तज्ञांनी म्हटले आहे.

मुंबईत 12 तासांत सर्वाधिक 215.8 मिमी पाऊस

मुंबईत 12 तासांत सर्वाधिक 215.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांमध्ये 101.9 मिलीमिटर तर पश्चिम उपनगरांमध्ये 76.03 मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 309 मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या ‘डी’ विभागात झाला. त्याचबरोबर मरीन लाईन्समध्ये संध्याकाळी दर तासाला तब्बल 101.4 किलोमीटर एवढा वाऱ्य़ाचा कमाल वेग होता. दरम्यान, गेले दोन दिवस मुसळधार पावसात महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी अव्याहतपणे काम करत आहेत.

टोलेजंग इमारतींमधील रहिवाशांमध्ये घबराट

दक्षिण मुंबईत उच्चभ्रू वस्ती आहेच पण त्याचबरोबर या भागात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारतीही आहेत. पावसाबरोबर वादळी वाऱ्य़ांचा दणका या इमारतींना मोठ्या प्रमाणात बसला. काचेच्या खिडक्या आणि तावदाने मोठे आवाज करत वाजू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. काही इमारतींमधील लोखंडी पत्रे आणि इतर सामान उडाले. हवामान विभागाने 3 ते 4 तास वादळी वाऱ्य़ाचे भाकीत केले होते. त्यानुसार पावसाबरोबर वादळी वाऱ्य़ाचा वेगही वाढला. पावसाऐवजी वाऱ्य़ाने धारण केलेले रौद्र रूप बघून अनेकांची बोबडी वळली.  

गल्लीतल्या झाडांनाही पावसाने झोडपले

दुपारी 12 वाजल्यापासून पावसाचा जोर जसा वाढला तसा वाऱ्य़ाचा जोरही वाढला. इमारतींच्या कोपऱ्य़ात, मैदान, बागांमध्ये उभ्या असलेल्या मोठ्या झाडांबरोबर गल्ल्यातल्या झाडांनाही त्याचा फटका बसला. मुंबईतीतील अनेक मोठी झाडे उन्मळून पडली तर गल्लीतल्या झाडांनाही त्याचा फटका बसला. छोटी झाडे मुळासकट तर काही झाडे फांदीपासून तुटून पडली. छत्री नसल्यामुळे एरवी झाडांचा आश्रय घेणाऱ्य़ांनीही झाडांपासून लांब राहत इमारती आणि इमारतींबाहेरच्या आडोशाचा आधार घेतला.

शिवसेनेतर्फे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल वाहतूक व्यवस्था

वादळी वारा आणि पावसामुळे चर्नी रोड ते मरीन लाईन्स येथे संध्याकाळी ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले. कोसळताच झाडाने पेट घेतला. मात्र, त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते चर्चगेट ही वाहतूक सेवा बंद करण्यात आली. यामुळे चर्चगेट स्थानकात अत्यावश्यक सेवेतील शेकडो प्रवासी अडकून पडले होते. याची माहिती मिळताच शिवसेनेतर्फे चर्चगेट स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकांच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल येथे आणण्यात आले. त्यामुळे अडकून पडलेले प्रवासी घरी परतू शकले. त्यामुळे शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला, अशी माहिती शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी दिली.

बाजार उघडला, पण पावसाचे कुलूप; पहिल्याच दिवशी मॉल्स, दुकानांना फटका

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांना बुधवारीही झोडपून काढले. त्यामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या मॉल्स, दुकानांवर ग्राहक फिरकलेच नाहीत. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने बाजार उघडले खरे पण प्रत्यक्ष व्यवहारांना कुलूपच लागले.

मुंबई महानगरपालिकेने ‘मिशनबिगीन अगेन’अंतर्गत सर्व दुकाने, मॉल्स सुरू करण्यास सोमवारी परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर, दुकानदार, मॉल्सचालकांनी सॅनिटाईझ करून मालाची नीटनेटकी मांडणी केली. मात्र, दिवसभर सुरू असलेल्या पावसाने दुकाने, मॉल्सच्या ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचू दिले नाही. पावसामुळे लोकांनी घरीच राहणे पसंत केले. काही जण फक्त भाजी, दूध या सारख्या अत्यावश्यक खरेदीसाठी घराबाहेर पडले. पावसाचा अंदाज घेऊन काही जणांनी दुकाने बंदच ठेवली.

आपली प्रतिक्रिया द्या